
नांदेड| राज्यातील शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी नुकताच महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शविला आहे. शेकापाचा महाविकास आघाडीला पाठिंबा असतानाही लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे हे कोणाच्या दावणीला बांधले गेले आहेत असा सवाल शेतकरी कामगार पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष योगेश पाटील नंदनवनकर यांनी उपस्थित केला आहे . आ. शामसुंदर शिंदे यांचे राजकारण म्हणजे संधी साधू बागळ्या सारखे असल्याचा घणाघाती आरोप आहे त्यांनी केला आहे.


गत विधानसभा निवडणुकीत चुकून लोहा कंधार विधानसभा मतदारसंघावर राजकारणातला र माहित नसणाऱ्या नेतृत्वाला थोपवले गेले . काही लोकांच्या पुण्याइने या विधानसभा मतदारसंघात उदयास आलेल्या अराजकीय या नेतृत्वाने अक्षरशः कळस गाठला आहे. प्रत्येक गोष्टीत संधी शोधणाऱ्या या नेत्याने राजकारणाची इभ्रत वेशीवर टांगली आहे. ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या त्या संधीची लूट करण्यासाठी या महाशयाकडून सातत्याने प्रयत्न असतात. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या या आमदाराने सुरुवातीच्या काळात तत्कालीन पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या ओंजळीने पाणी पिणे पसंद केले.


शिवाजीनगरच्या इशारावर बिनबोहाटपणे आरोपांच्या फेरी झाडणाऱ्या आ. शामसुंदर शिंदे यांना येथे फार काय टिकता येणार नाही याची थोडीशी जाणीव होऊ नये इतके त्यांचे राजकीय अज्ञान आहे . सत्ता आणि राजकारणाच्या सारीपाटात आपली पोळी शेकून घेणाऱ्या आ. शामसुंदर शिंदे यांनी महाविकास आघाडीचे सरकार कोसळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात जाणे पसंत केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही बिनशर्थ पाठिंबा देणाऱ्या शामसुंदर शिंदे यांनी मोठी माया गोळा केल्याची चर्चा आहे. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाची ध्येय धोरणेच पायदळी तुडवली आहेत.


शेतकरी आणि कामगारांच्या कोणत्याही प्रश्नांची आणि समस्यांची जाणीव नसणाऱ्या या नेतृत्वाने गेल्या तीन साडेतीन वर्षाच्या काळात नांदेड जिल्ह्यातील कोणत्याही शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या प्रश्नांकडे साधे लक्ष दिले नाही. एवढेच नाही तर लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांवर त्यांची सत्ता आली नाही. साध्या सेवा सहकारी सोसायटीवरही त्यांना एखादा सदस्य निवडून आणता आला नाही इतके राजकीय दारिद्र्य त्यांच्या नशिबी कायम राहिले आहे . असे असतानाही आपला दळभद्रीपणा लपवण्यासाठी आणि एखाद्या चांगुलपणावर बेछूट आरोप करणारे आ. शामसुंदर शिंदे यांनी आता महाविकास आघाडीला पाठिंबा देणार का असा सवाल या निमित्ताने नंदनवनकर यांनी उपस्थित केला आहे.

शिवाजीनगरच्या इशारावर नांदेड जिल्ह्यातील राजकारणात बिनकामाची ढवळाढवळ करणारे आ. शिंदे यांनी मतदारांचा विचार केला नाही. किंबहुना केवळ संधी शोधत बसणाऱ्या या राजकीय बगळ्याने स्वयंघोषित नेतृत्वच लोकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न चालविला आहे . कधी महाविकास आघाडी तर कधी शिवसेना तर कधी भारतीय जनता पार्टीच्या युती सरकारला बिनशर्थ पाठिंबा देऊन केवळ खोके मिळवण्याचा यांचा गोरख धंदा आता सर्वांना माहित झाला आहे . त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच आ. श्यामसुंदर शिंदे यांचा खरा चेहरा लोकांसमोर आला असल्याने ते नेमकी कोणाच्या दावणीला बांधले गेले आहेत असा सवाल शेतकरी कामगार पक्षाचे माजी जिल्हाअध्यक्ष योगेश पाटील नंदनवरकर यांनी उपस्थित केला आहे. जयंत पाटील यांच्या स्पष्ट भूमिके नंतर आता आ. शामसुंदर शिंदे हे भूमिका स्पष्ट करणार काय असे खुले आव्हान आहे त्यांनी दिले आहे.
