
अर्धापूर,निळकंठ मदने| राज्यात शिवसेनेत दोन गट झाल्यापासून अर्धापूर तालुक्यात उद्धव ठाकरे शिवसेनेत तिन महत्वाच्या नियुक्त्या झाल्या. शहरात मुस्लिम संख्या लक्षणीय असल्याने शिवसेनेने शहरप्रमुखपदी काजी सल्लाऊद्दीन यांना मुंबई येथे खा.विनायक राऊत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड केली आहे. या निवडीमुळे शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला आहे.


राज्यात शिवसेनेत दोन गट पडून एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार व १३ खासदासह बाळासाहेबांची शिवसेना स्थापन केली. त्यामुळे अर्धापूर तालुक्यातील शिवसेनेचे काही पदाधिकारी एकनाथ शिंदे गटात गेल्याने जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख ही महत्त्वाची पदे रिक्त झाली होती. ऊध्दव ठाकरे शिवसेनेने जिल्हाप्रमुखपदी बबनराव बारसे तर संतोष कल्याणकर यांची तालुकाप्रमुखपदी वर्णी लागली होती. शहरप्रमुखपद रिक्त असल्याने शहरात कार्यक्रम घेतांना कोणत्या कार्यकर्त्यांवर जबाबदारी टाकावी हा प्रश्न पडला होता.


त्यामुळे शिवसेनेचे जुने व निष्ठावंत शिवसैनिक काजी सल्लाऊद्दीन यांना शिवसेनेचे नेते खा.विनायक राऊत यांच्या हस्ते मुंबईत अर्धापूर शहरप्रमुख पदाचे नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख बबनराव बारसे, जिल्हाप्रमुख माजी आ.नागेश पाटील आष्टीकर,तालुकाप्रमुख संतोष कल्याणकर, नागेश सरोळे, अशोक डांगे, रमेश क्षीरसागर, भगवान पवार,शेख रफीक यांची उपस्थिती होती. ही निवड मुंबई येथून झाल्याने व एका मुस्लिम शिवसैनिकांला शहरप्रमुख पदावर नियुक्तीमुळे तालुक्यातील मुस्लिम समाजात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

