
नांदेड। ज्येष्ठ पत्रकार सुधाकरराव डोईफोडे यांनी समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांसाठी आपली लेखणी झिजवली. त्यांच्या विचाराने नव्या पिढीतील पत्रकारांनी मार्गक्रमण करावे, असे प्रतिपादन प्रख्यात विचारवंत, साहित्यिक व ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुधीर गव्हाणे यांनी केले. यंदाचा दिवंगत सुधाकरराव डोईफोडे जीवनगौरव पुरस्कार डॉ. सुधीर गव्हाणे यांना प्रदान करण्यात आला. रविवारी सायंकाळी पीपल्स महाविद्यालयाच्या परिसरातील नरहर कुरुंदकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे होते. माजी खा. डॉ. व्यंकटेश काब्दे, दैनिक प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियाणी यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे, कॉ. प्रदीप नागापूरकर, किरण चिद्रावार, सूर्यकांत वाणी, उमाकांत जोशी, प्रा. अशोक सिद्धेवाड, सीए प्रवीण पाटील यांची उपस्थिती होती.


या वेळी बोलताना सुधीर गव्हाणे म्हणाले की, सुधाकररावांनी निर्भयपणे पत्रकारिता केली. स्वातंत्र्यसैनिक, निर्भिड पत्रकार, विकासाच्या प्रश्नावर लढणारे अभ्यासू कार्यकर्ते अशा विविधांगांनी त्यांची ओळख होती. त्यांनी नेहमी पत्रकारितेचा धर्म पाळला. वैयक्तिक आयुष्यात मला त्यांचे आशीर्वाद लाभले. नांदेडनगरी विद्वानांची आहे. नरहर कुरुंदकर, सुधाकरराव डोईफोडे यांच्यासारखी मंडळी येथे होती, आज अशी माणसे दिसत नाहीत, हा चिंतेचा विषय आहे.


जगाचे गोडवे गाणार्या, लोकांवर झालेला अन्याय दूर करणार्या पत्रकारांचे गोडवे कुणी गात नाही, त्याच्यावरचा अन्याय देखील तो स्वतः दूर करू शकत नाही, तरीसुद्धा पत्रकार समाजाची सेवा करतात. त्यामुळे त्यांना अशा पुरस्कारांच्या माध्यमातून किमान सन्मान तरी मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. गव्हाणे यांनी व्यक्त केली. आणीबाणीच्या काळात कुरुंदकर गुरुजींनी आपल्या कल्पकतेने सरकारवर कोरडे ओढले. कुरुंदकर तसेच सुधाकरराव डोईफोडे यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचे विस्मरण नव्या पिढीला होऊ नये.

सुधाकररावांची जेवढी गुणवत्ता होती, त्या तुलनेत त्यांची म्हणावी तेवढी दखल घेतली गेली नाही. स्व. अनंतराव भालेरावांच्या एवढेच मोठे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. आजची वृत्तपत्रे प्रजेची वाणी राहिलेली नाहीत. बरेच जण पोपट झालेत. ज्यांना मराठी भाषेचे साधे ज्ञान नाही, अशी मंडळीदेखील या क्षेत्रात ब्लॅकमेलिंगचा धंदा करतात, हे आपले दुर्दैव आहे. पत्रकारिता सत्तावाणी झाली आहे. सत्तेविरुद्ध बोलण्याची हिमत कोणात नाही.

सुधाकररावांनी पत्रकारितेचा धर्म निष्ठेने पाळला. आपल्या लेखणीद्वारे त्यांनी दरारा निर्माण केला होता. पत्रकारांबद्दलचा आदरभाव कमी होतोय, चांगले काम करणार्यांना संधी मिळाली पाहिजे, यातूनच सिटीझन जर्नालिझम उदयास आली आहे. यासाठी सोशल मिडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे डॉ. सुधीर गव्हाणे यांनी सांगितले.

पत्रकारितेसह सर्वच क्षेत्रात प्रदूषण झाल्याचे ते म्हणाले. सुधाकररावांचे स्मरण करताना आपण वंचितांसाठी आपली लेखणी झिजवली पाहिजे, असा संदेश त्यांनी नव्या पिढीतील पत्रकारांना दिला. विरोधी पक्ष दुर्बल होतात, त्या वेळी त्यांची भूमिकाही पत्रकारांनी पार पाडण्याची गरज आहे. जनहिताच्या विरोधात होणारे काम उजागर करण्याची जबाबदारी पत्रकारांची आहे.
आज समाजाला कुशल पत्रकार व प्रशासकाची गरज आहे. दैनिक प्रजावाणीने समाजात चांगले काम करणार्यांना डोक्यावर घ्यावे. आपल्या समाजात प्रतिभा खूप आहे, परंतु गरज आहे ती या प्रतिभेला प्रोत्साहन, पुरस्कार देणार्यांची. आपल्याला शाश्वत विकास हवा आहे. जनहिताचे, उपेक्षितांचे प्रश्न पत्रकारांनी मांडावेत, मराठवाड्याचा विकास, येथील प्रश्न ज्या तडफेने सुधाकररावांनी मांडले, त्या तडफेने नव्या पिढीच्या पत्रकारांनी काम करावे. माझे त्यांच्या विचारांशी जवळचे नाते आहे. त्यामुळे मी कृज्ञतापूर्वक हा पुरस्कार स्वीकारत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सुरुवातीला दैनिक प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा.सौ. रेश्मा डोईफोडे यांनी केले तर कॉ. प्रदीप नागापूरकर यांनी आभार मानले. डॉ. बालाजी कोम्पलवार व प्रा. अशोक सिद्धेवाड यांनी पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या मानपत्राचे वाचन केले. या कार्यक्रमाला प्राध्यापक, साहित्यिक, पत्रकार व सुधाकरराव डोईफोडे यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात छायाचित्रकार विजय होकर्णे तसेच स्वाराती मराठवाडा विद्यापीठातील माध्यम विभागाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
विलास बडे – या वेळी राज्यस्तरीय युवा पत्रकारिता पुरस्कार आयबीएन लोकमतचे वृत्त निवेदक विलास बडे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना विलास बडे यांनी सांगितले की, सुधाकरराव डोईफोडे यांच्या नावाने पुरस्कार मिळणे ही माझ्यााठी भाग्याची गोष्ट आहे. मराठवाड्याच्या अस्मितेला नख लावण्याचे काम होत आहे. आमच्या अनेक योजना गेल्या, येथील हजारो कामगार स्थलांतरीत होत आहेत. या गोष्टी वेदना देणार्या आहेत. आम्हाला महाराष्ट्र आमचा वाटला म्हणून आम्ही बिनशर्थ महाराष्ट्रात राहिलो. परंतु, सत्तेत येणार्या सगळ्यांनीच मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसली. परंतु, दुर्दैवाने मराठवाड्यात जनतेचा आक्रोश दिसत नाही. आपल्यात मागासलेपणाचा जो न्यूनगंड आहे, तो काढून टाकला पाहिजे. मराठवाड्याच्या विकासाची अस्मिता जपण्यासाठी सर्वांनी आता लढण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. यानिमित्ताने स्व. सुधाकरराव डोईफोडे यांनी आंदोलनाच्या माध्यमातून केलेल्या संघर्षाची आपल्याला आठवण होते, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. व्यंकटेश काब्दे – सुधाकरराव डोईफोडे हे कृतिशील पत्रकार होते. टिळक, आगरकर, अनंतराव भालेराव यांचा वारसा त्यांनी चालवला. दैनिक प्रजावाणीच्या माध्यमातून शंतनू डोईफोडे, गोवर्धन बियाणी आता सुधाकररावांचा वारसा चालवत आहेत. त्यांच्या व्यावहारिक कसबामुळे पूर्वीपेक्षाही आज प्रजावाणीला चांगले स्वरूप प्राप्त झाले आहे. मराठवाड्याचा विकास तसेच रेल्वे विषयक प्रश्न सोडविण्याच्या बाबतीत सुधाकररावांचे मोठे योगदान होते. मला त्यांचा सहवास व मार्गदर्शन लाभले. त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली. स्व. गोविंदभाई श्रॉफ व सुधाकररावांमुळे मराठवाड्यातील अनेक आंदोलनांना गती मिळाली होती. त्यांचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे. परंतु, आपण कुठे तरी कमी पडत आहोत. मराठवाड्याला झुकते माप तर सोडाच आपल्या हक्काचा वाटाही मिळत नाही. शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रात मोठा अनुशेष आहे. सरकारवर दबाव टाकणारा कुणी राहिला नाही. आजची पत्रकारिता भांडवलदार व सत्ताधार्यांची गुलामी करणारी झाली आहे, असे ते म्हणाले.
अभिजित राऊत – ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते सुधाकरराव डोईफोडे हे खर्या अर्थाने नांदेडचे भूषण होते, अशा शब्दात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सुधाकररावांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. माध्यमाचे काम आरसा दाखवण्याचे असते. घटनेचे विश्लेषण करून लोकांपुढे ठेवण्याची भूमिका असते. माध्यमांचा निःपक्षपातीपणा आणि विश्वासार्हता महत्त्वाची असून, ते टिकविण्याचे आव्हान माध्यमांपुढे आहे. सोशल मिडियावरची माहिती खरी की खोटी, ही तपासण्याासठी प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा आधार घ्यावा लागतो. सोशल मिडिया क्षणभंगूर आहे. परंतु, मिडियाचे महत्त्व चिरकाल टिकणारे आहे. माध्यमांचा शासन व्यवस्थेवरदेखील वचक असणे आवश्यक आहे. समाजाचा विकास म्हणजे काय तर शासनावरचे लोकांचे अवलंबित्व कमी झाले पाहिजे. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजप्रबोधन होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.