
लोहा| लोहा शहरातील नांदेड -लातूर राष्ट्रीय महामार्गावरील मुख्य चौकात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची नियोजित जागा आहे.या ठिकाणी शिवरायांचा पुतळा बसविण्यात यावा ही मागणी प्रारंभी कै. माजी खा. भाई केशवराव धोंडगे यांनी लावून धरली होती.अनेक सामाजिक व राजकीय संघटनांनी सदरील मागणीसाठी विविध प्रकारचे आंदोलने केली.


मात्र पालिकेतील प्रत्येक सत्ताधारी तसेच या भागाच्या आमदार, खासदारांनी शिवरायांच्या पुतळ्याचे केवळ राजकारण करत हा महत्त्वपूर्ण प्रश्न प्रलंबित ठेवला.19 फेब्रुवारीपर्यंत सदरील पुतळा सन्मानपूर्वक नियोजित ठिकाणी बसविण्यात यावा अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा लोहा न.प. चे तरुण तडफदार माजी उपनगराध्यक्ष सोनू उर्फ व्यंकटेश संगेवार यांनी दिला आहे.


मध्यंतरी पुतळा स्मारक समिती गठीत करून स्मारकाचा चबुतरा देखील बांधला मात्र, पुतळा बसविण्यास भाजपाच्या ताब्यातील पालिकेकडून टाळाटाळ होत असल्याने माजी उपनगराध्यक्ष तथा काँग्रेस कमिटीचे विद्यमान तालुकाध्यक्ष शरद पवार यांनी १ जानेवारी रोजी लोकसहभागातून पुतळा खरेदी केला. सदरील पुतळा स्मारकाच्या नियोजित ठिकाणी बसविण्यास घेवून जात असताना तो अडवून पालिकेकडे सुरक्षितरित्या वर्ग करण्यात आला. सदरील पुतळ्याच्या आवश्यक त्या सर्व चाचण्या, परीक्षण करून शिवरायांचा अश्वारूढ पुतळा लोहा शहरातील चौकस्थित स्मारकाच्या नियोजित ठिकाणी दि. १९ फेब्रुवारीपर्यंत सन्मानपूर्वक बसविण्यात यावा अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.


असा इशारा माजी उपनगराध्यक्ष सोनू उर्फ व्यंकटेश संगेवार यांनी दिला आहे. अनेक वर्षापासून पुतळा विषय प्रलंबित ठेवून निवडणुकीच्या तोंडावर केवळ राजकारण केले जात आहे. हे सर्व शहरवासीयांच्या लक्षात येऊ लागल्याने लोहा शहरातील नागरिक तसेच युवा वर्ग या आंदोलनासाठी पुढाकार येत आहे. परिणामी शिवाजी महाराज जयंती म्हणजेच 19 तारखेच्या ‘अल्टिमेटमने’ पालिकेच्या सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी मात्र निश्चितच वाढली आहे.
