नांदेड| काही चाली-रितींना बाजूला सारत महिलांच्या हळदी-कुंकूवाच्या कार्यक्रमामध्ये सुहासीन महिलांसोबत विधवा महिलांचा सन्मान करणे ही भविष्यातील वैचारिक परिवर्तनाची नांदी आहे. शिवालय प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. संध्याताई बालाजीराव कल्याणकर यांचा स्तुत्य उपक्रम आहे, असे गौरोद्गार सामाजिक कार्यकर्त्या सौ. राजश्री हेमंत पाटील यांनी काढले.
नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या सुविद्य पत्नी शिवालय प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. संध्याताई कल्याणकर यांनी नांदेड शहरातील भक्ती लॉन्स येथे मतदार संघातील महिलांसाठी भव्य असा हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम दि. 23 जानेवारी रोजी आयोजित केला होता. यावेळी सौ. पाटील बोलत होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाचे आ. बालाजीराव कल्याणकर, सामाजिक कार्यकर्त्या सौ. राजश्री पाटील, महिला संपर्कप्रमुख सौ. रत्नमालाताई मुंडे, शिवालय प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा आयोजक सौ. संध्याताई कल्याणकर, महिला शहरप्रमुख गीताताई पवार, सामाजिक कार्यकर्त्या अर्पणा साळवे, मीनाक्षीताई सुर्यवंशी, शहरप्रमुख सचिन किसवे, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण कदम, संतोष भारसावडे, बालाजी पावडे, मुन्ना राठोड, सचिन पाटील आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना सौ. राजश्री पाटील म्हणाल्या की, हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम सुहासीन महिलांसाठी असतो, अशी परंपरा सुरू आहे. त्या परंपरेला छेद देत सामाजिक परिवर्तन घडविण्यासाठी संध्याताई कल्याणकर यांनी विधवा महिलांना निमंत्रीत करून त्यांना सोडी-चोळी करून त्यांचा सन्मान केला आहे. ही खरोखरच अत्यंत चांगली बाब आहे. यामुळे निश्चित परिवर्तन घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच यावेळी आयोजक तथा शिवालय प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. संध्याताई कल्याणकर म्हणाल्या की, प्रत्येकाला समाजामध्ये सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. परंतु काही परंपरा माणसाचा आनंद कमी करतात. विधवा महिलांनाही हळदी-कुंकू कार्यक्रमाचा आनंद घेता यावा, त्यांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण असावा या हेतूने प्रेरित होऊन सुहासीनी महिलांसोबत विधवा महिलांना हळदी-कुंकूवाच्या कार्यक्रमात निमंत्रीत करून साडी-चोळी देवून हळद-कुंकू लावून त्यांचा सन्मान केला आहे.
दरवर्षी हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम आयोजित करते. यावर्षी पहिल्यांदाच विधवा महिलांना या कार्यक्रमात सन्मानीत करण्यात आले आहे, याचा मला आनंद आहे. समाजामध्ये ज्या काही वाईट बाबी आहेत, त्या कमी व्हायला हव्यात एवढाच या मागचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. आयोजित करण्यात आलेल्या हळदी-कुंकूवाच्या कार्यक्रमामध्ये बचत गटाच्या महिलांचाही सहभाग होता व नांदेड शहर व ग्रामीण भागातील अनेक महिलांचे मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दुपारपासून सुरू झालेला कार्यक्रम सायंकाळी उशीरापर्यंत सुरू होता.