
नांदेड,अनिल मादसवार | केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून सन 2019 पासून जल जीवन मिशन हा एक महत्वांकाक्षी प्रकल्प सुरु करण्यात आलेला आहे. सदर अभियानांतर्गत “ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना विहीत गुणवत्तेसह, पुरेसे (55 लिटर प्रति मानसी, प्रतिदिनी) व नियमित स्वरुपात पाणी पुरवठा करण्याचे” उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. याव्दारे जिल्हयातील ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना कार्यान्वित नळ जोडणीव्दारे पाणी पुरवठा उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच, येत्या मार्च 2024 अखेर संपूर्ण जिल्हा हा “हर घर नल से जल” म्हणून घोषित करण्याचे राज्याने उद्दिष्ट ठेवले आहे.


हर घर जल से नल या उपक्रमास लोकसहभाग व पारदर्शकता मिळवून देण्यासाठी विविध स्तरावर व्यापक प्रचार, प्रसिध्दीचे काम सुरु आहे. त्याअनुषंगाने येत्या 26 जानेवारी 2023 रोजी होणा-या ग्रामसभेमध्ये जल जीवन मिशन संदर्भात वाचन, मार्गदर्शन व चर्चा करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. ग्रामसभे दरम्यान ग्रामपंचायत सदस्यांसोबत ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या सदस्यांना आमंत्रित करुन विशेष स्थान देण्यात येवुन व समिती सदस्यांची ओळख तसेच त्यांच्या अधिकार व जबाबदारीबाबत उपस्थित ग्रामस्थांना अवगत करण्यात येणार आहे.


पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षणांतर्गत पाणी गुणवत्ता चाचणीसाठी प्रशिक्षीत करण्यात आलेल्या 5 महिलांना सभेस आमंत्रित करुन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक गावातील पाणी गुणवत्ता निरीक्षक महिलांची संपर्क क्रमांकासहीत नावे गावातील सार्वजनिक ठिकाणी ठळकपणे प्रसिध्द करणेत येणार आहेत, जेणेकरुन त्यांचा उत्साह वाढीस लागून पाणी गुणवत्ता राखण्याच्या अनुषंगाने गाव स्वयंनिर्भर होईल. ग्रामसभेत क्षेत्रिय तपासणी संच (FTK) संचातुन पाणी नमुना तपासणीचे प्रात्यक्षीत आरोग्य सेवक व जलसुरक्षक मार्फत करण्यात येणार आहे.


तसेच ग्रामसभेत क्षेत्रिय तपासणी संच (FTK) च्या माध्यमातून महिलांद्वारे स्त्रोतांची तपासणी व नळ जोडणीव्दारे येणाऱ्या पाण्याच्या नियमित तपासणीबाबतच्या कार्यपध्दतीची माहिती ग्रामसभेमध्ये देण्यात येईल. यावेळी क्षेत्रिय तपासणी संचाचे मदतीने, पाणी गुणवत्ता तपासणी अनुषंगाने 5 महिलांच्या माध्यमातून प्रात्यक्षिक करण्यात यावे जेणेकरुन ग्रामस्थांचा नळ पाणी पुरवठा योजनेच्या पाणी गुणवत्तेच्या अनुषंगाने आत्मविश्वास वाढीस लागेल.

ग्रामसभे दरम्यान जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर योजनेची सविस्तर माहिती जसे योजनेचे उद्दिष्ट, योजनेतील समाविष्ट उपांगे, मंजुर निविदेची रक्कम, योजनेचा कालावधी, कंत्राटदारांचे नाव, नळ जोडणीची सद्यस्थिती इ. तसेच प्रगतीत असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांची माहिती देण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत गावातील पाणी पुरवठा सुविधांच्या अनुषंगाने आवश्यक जमा करावयाचा समुदायाचा वाटा (लोकवर्गणी 10%), जमा झालेली रक्कम व उर्वरित जमा करावयाची रक्कम याबाबत आवश्यक कृती योजना आखण्यावाबत चर्चा घडवून आणण्यात येणार आहे.

ज्या ठिकाणी योजनेची भौतिक कामे अंतिम टप्प्यात आहेत अशी गावे “हर घर नल से जल” म्हणून घोषित करण्यात येणार आहेत. नळ पाणी पुरवठा योजना पुर्णत्वानंतर योजना शाश्वततेच्या दृष्टीने आवश्यक पाणीपट्टी वसुली तसेच योजनेची थकीत पाणीपट्टी वसुलीसंदर्भात विशेष चर्चा करण्यात येणार आहे. जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेची माहिती दर्शविणारे माहिती फलक योजनेच्या ठिकाणी प्रदर्शित करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी आधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, जल जीवन मिशचे प्रकल्प संचालक नारायण मिसाळ व कार्यकारी अभियंता अमोल पाटील यांनी दिली आहे.
