नांदेड| शहरासह जिल्ह्यात खाजगी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून जीवघेणी प्रवासी वाहतुक सुरु आहे. मागील अनेक वर्षापासून हा प्रकार सुरु आहे. ही वाहतुक बंद करावी अशी मागणी एमआयएमचे महानगर सचिव बशीर लाला यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे केली होती. या पत्राची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रादेशिक परिवहन अधिकार्यांना पत्र पाठवून या संबंधीत कारवाई केल्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
खाजगी ट्रॅव्हल्स शहरातील रेल्वेस्थानक, हिंगोली गेट, बाफना आदी ठिकाणी मुख्य दस्त्यावर लावण्यात येतात यामुळे वाहतुकीची कोंडी देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. शहरासह तालुक्याच्या ठिकाणी देखील मुख्य रस्त्याच्या मधोमध ट्रॅव्हल्स थांबवून प्रवाशी घेण्यात येतात. या प्रकारामुळे अनेकजण वैतागले असून वाहतुकीच्या कोंडीबरोबरच या खाजगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले.
या खाजगी ट्रॅव्हल्सना शहरात बंदी करुन यांना शहराबाहेर थांबा द्यावा किंवा ही वाहतुक बंद करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बशीर लाला यांनी एका निवेदनाद्वारे दिला होता. या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रादेशिक परिवहन अधिकार्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.