
नांदेड| भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार 26 जानेवारी 2023 रोजी नांदेड वजिराबाद परिसरातील पोलीस मुख्यालय पोलीस कवायत मैदान येथे सकाळी 9.15 वा. राष्ट्रध्वज वंदन व संचलनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे.


सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी होण्यापुर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्या दृष्टीने सोबत कोणतेही बँग किंवा तत्सम वस्तू आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 वाजेपूर्वी किंवा 10 वाजेनंतर आयोजित करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.


दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृह विभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमूद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, असेही आवाहनही राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय जनजागरण समितीने केले आहे.


जिल्ह्यातील प्रत्येक शाळांमधून 3 लाख 50 हजार विद्यार्थी बालविवाह विरोधी घेणार शपथ
नांदेड जिल्ह्यातील मुलींना आपले भावाविश्व निकोप जपून सुदृढ होता यावे यासाठी बेटी बचाव बेटी पढाव ही चळवळ सुरु आहे. हा संदेश प्रत्येक गावात पोहचावा यासाठी प्रजासत्ताक दिनी जिल्ह्यातील सुमारे तीन लाख पन्नास हजार विद्यार्थी बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घेणार आहेत.

नांदेड जिल्ह्यातील सर्व प्राथमिक / माध्यमिक शाळा तसेच अंगणवाडी केंद्रामध्ये प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2023 रोजी बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञेचे (आम्ही बाल विवाह करणार नाही व इतरांना करूही देणार नाही) आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात शाळेतील ध्वजारोहन संपताच ही शपथ घेतील असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.

दिनांक 24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून तसेच “बेटी बचाओ-बेटी पढाओ” हा कार्यक्रम अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी दिनांक 18 ते 24 जानेवारी या कालावधीत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. “बेटी बचाओ-बेटी पढाओ” या योजनेचा मुळ उद्देश लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलीच्या शिक्षणाबाबत खात्री देणे व मुलीच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे आहे. .
