
अर्धापूर,निळकंठ मदने। मराठवाड्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या नांदेड अर्धापूर रस्त्यावरील दाभड परिसरातील सत्य गणपती देवस्थान दाभड येथे तहसिल प्रशासनाच्या वतीने गणेश जयंती निमीत्त येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद व सावलीसाठी मंडप आदि व्यवस्था महसूल विभागाने केली. या महाप्रसादाचा लाभ असंख्य भाविकांनी घेतला.

नांदेड अर्धापूर रस्त्यावरील दाभड (भोकरफाटा) परिसरातील सत्य गणपती देवस्थान एक जागृत देवस्थान म्हणून मराठवाड्यात प्रसिद्ध आहे येथील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी दर महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला गणेश भक्तांची खूप मोठी गर्दी होत असते. सन १९९३ साली गणेश जयंतीच्या मुहूर्तावर ष.ब्र श्री गुरु शिध्दलिंग शिवाचार्य स्वामी (वेदांताचार्य) साखरखेर्डा, जिल्हा बुलढाना यांच्या हस्ते “श्री सत्य गणपती”मुर्ती प्राण प्रतिष्ठा व कलशारोहन करण्यात आले होते.

तेव्हापासून प्रतिवर्षा प्रमाणे या ही वर्षी मंगळवार दि.२५ जानेवारी रोजी गणेश जयंतीच्या मुहूर्तावर तहसील प्रशासक यांच्या हस्ते श्री सत्य गणपती मुर्तीला अथर्वशीर्ष सहस्रावर्तन महाभिषेक करण्यात आला. सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत अन्नदान करण्यात आले.

यावेळी असंख्य भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. प्रशासक तहसिलदार उज्वला पांगरकर यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार मारोतराव जगताप, मंडळ अधिकारी संजय खिल्लारे,तलाठी रवी पल्लेवाड, मंदिर व्यवस्थापक गोविंद पाटील, जगन्नाथ साखरे,प्रदीप मोरे,बाळकृष्ण बन आदींनी पुरक व्यवस्था ठेवली होती. या कार्यक्रमासाठी पोलीस निरिक्षक अशोक जाधव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

