
नांदेड| महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 40 (2) (ख) तरतुदीनुसार विद्यापीठाच्या विविध अभ्यास मंडळावर नामनिर्देश करण्याची प्रक्रिया विद्यापीठाच्या स्तरावर सुरु झाली आहे. त्यात संबंधित विषयातील विद्यापीठ विभागाच्या पूर्णवेळ अध्यापक मधून एक अध्यापक तसेच संबंधित विभागातील पदव्युत्तर अभ्यासक्रम देऊ करणाऱ्या सलग्न महाविद्यालयामधील किंवा मान्यताप्राप्त परिसंस्था मधील किंवा पदव्युत्तर केंद्रामधील मान्यता प्राप्त पदव्युत्तर अध्यापकातून दोन अध्यापक तसेच सलग्न महाविद्यालयाचे आणि मान्यता प्राप्त परिसंस्था यामधील विभाग प्रमुख नसलेला तीन अध्यापक असावेत असे निर्देशित आहे.

त्या अनुषंगाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या इंग्रजी अभ्यास मंडळासाठी चार जिल्ह्यातून अशासकीय वरिष्ठ अनुदानित महाविद्यालयातील इंग्रजी विषयातील अनेक प्राध्यापकांनी स्वीकृत सदस्य निवड होण्यासाठी रीतसर अर्ज केला आहे.सदरील निवडीची प्रक्रिया ही मा.कुलगुरू यांच्या आदेशान्वये मानव्यशास्त्र अभ्यासक्रमाचे मा.अधिष्ठाता यांच्याशी विचारविनिमय करून अंतिम सहा सदस्यांची निवड करण्यात येते. परंतु सदरील निवडीच्या प्रक्रिया ही पारदर्शकता व गुणवत्तेवर व्हाव्यात अशी मागणी अकॅडमिक ऍक्टिव्हिस्ट डॉ. राजपालसिंह चिखलीकर यांनी एका निवेदनाद्वारे मा. कुलगुरू महोदय यांना केली आहे.

सदरील निवेदनात डॉ. चिखलीकर यांनी केली आहे तसेच त्यांनी अनेक शंका -कुशंका उपस्थित केल्यात त्यात राजकीय वशिलेबाजी तथा जवळच्या लोकांची वर्णी लावू नये कारण काही विद्वत्ता असलेल्या व गुणवत्ता धारक प्राध्यापकांनी विद्यापीठात अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जाची पारदर्शक छाननी होणे गरजेचे आहे तसेच त्याचे पावित्र्य जपले पाहिजे व सतर्क बाळगली पाहिजे अशा आग्रहाची विनंती विनंती निवेदनात केली आहे तसेच या निवेदनात सदरील निवड ही जाती धर्माचा भेदभाव व विचार न करता संविधानिक पद्धतीने प्राध्यापकांची अभ्यास मंडळावर नियुक्ती करावी. तसेच विषयाच्या संबंधित अधिष्ठातांनी त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हस्तक्षेप न करण्याची कायदेशीर धारणा आहे.त्यामुळे सध्या निवड होण्याच्या अगोदरच काही प्राध्यापक एकमेकांना अभिनंदन करण्याची संकेत प्राप्त झाले आहेत व अभ्यास मंडळाच्या चेअरमन सुद्धा ठरल्याची बाब सध्या इंग्रजी विषयाच्या क्षेत्रात खरमरीत चर्चा खाजगी मध्ये होत आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग (4)(ब) उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे दि. 28 एप्रिल 2017 च्या अधिसूचना आणि विविध प्राधिकरणावर नामनिर्देशित करायच्या पात्रता व शर्तीनुसार सदरील इंग्रजी अभ्यास मंडळावर नियुक्ती करावी तसेच जे प्राध्यापक विद्या विषयक ज्ञान संपादित व अनुभवी ज्ञानी व इंग्रजी विषयासाठी ज्यांचे योगदान आहे. अशा प्राध्यापकांची निवड व्हावी असे डॉ. चिखलीकर यांनी माननीय कुलगुरू महोदय यांना समक्ष भेटून निवेदन देऊन चर्चा केली आहे.

