
नांदेड/तामसा। ग्रामीण भागातील महिला भगिनींच्या समस्या निवारणासह त्यांच्या सक्षमीकरणासाठी आपण कर्तव्य समजून कटिबद्ध असून यासाठी सदैव कर्तव्यतत्पर राहू अशी ग्वाही यशस्वीनी सामाजिक अभियानाच्या जिल्हा समन्वयक सौ.निर्मलाताई सोनकांबळे यांनी दिली. यशस्वीनी सामाजिक अभियान व जनकल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तामसा ता.हदगांव येथे शनिवारी दि.२८ जानेवारी २०२३ रोजी आयोजित हळदी- कुंकवाच्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या.

याप्रसंगी पूढे बोलतांना सौ.सोनकांबळे म्हणाल्या की,या देशात पूर्वापारपासून महिलांना मानाचे स्थान आहे परंतू,त्यांच्या शिक्षणाचे महत्व जाणून महात्मा ज्योतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी पहिल्यांदा स्त्री शिक्षणाचा पाया रचला तर,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून समान न्याय व हक्काची जाणीव करुन देत आम्हाला बळ दिले म्हणूनच ग्रामीण भागातही प्रत्येक क्षेत्रांत मुली व महिला आघाडीवर असून स्वस्वावलंबनात मात्र उपेक्षित आहेत.

हिच बाब ध्यानी घेऊन खा.सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वात यशस्वीनी सामाजिक अभियान सर्वत्र महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला भगिनींच्या स्वावलंबन व सक्षमीकरणासाठी आम्ही कार्यरत असून काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून भविष्यातही महिलांना स्वावलंबी होण्यासाठी विविध प्रशिक्षण शिबिर,विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचा व ग्रामीण भागातील महिलांना उद्योजकाकडे वळविण्याचा आमचा मानस असल्याचे सांगितले.
अनुराधा थोंबाळे,सायरा खुरेशी,मनिषा जाधव,रेणू शिंदे,आम्रपाली जाधव आदींनी या उपक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

दरम्यान पहिल्यांदाच तामसा शहर व परिसरात उपेक्षित असलेल्या महिलांसाठी यशस्वीनी सामाजिक अभियान व जनकल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांनी सामाजिक कार्य व कर्तव्य म्हणून राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमासाठी उपस्थित सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली. या उपक्रमाला तब्बल २०० हून अधिक महिलांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

