
नांदेड/हिमायतनगर| तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव दि. ५ फेब्रुवारीला नांदेडमध्ये संवाद मेळावा घेणार आहेत. तेलंगणबाहेर त्यांचा हा पहिलाच मेळावा असल्याने याची जय्यत तयारी नांदेडमध्ये सुरू आहे. बी.आर. एस. च्या नेत्यांनी नांदेडमध्ये आजी, माजी लोकप्रतिनिधींच्या गाठीभेटी घेऊन त्यांना बीआरएसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे. काही सीमावर्ती तालुक्यात बैठकाही सुरू झाल्या आहेत. यासाठी मागील आठवड्यापासून तेलंगणातील विद्यमानसह माजी लोकप्रतिनिधी तळ ठोकून आहेत. याशिवाय मंत्र्यांचे दौरेही वाढले आहेत.

तेलंगणा राज्यातील बीआरएस पार्टी (भारत राष्ट्र समिती) नांदेडमधून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करणार आहे. म्हणून पक्षवाढीसाठी बीआरएस पार्टीच्या नेत्यांनी नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती तालुक्यात लक्ष केंद्रित केले आहे. बिलोली, देगलूर, धर्माबाद, किनवट, हिमायतनगर, भोकर हे तालुके तेलंगणाच्या सीमेला जोडलेले आहेत. या तालुक्यांमध्ये तेलगू भाषिकांची संख्याही मोठी आहे. त्यांचा रोटीबेटीचा व्यवहार तेलंगणाशी आहे. त्यांचे रोजचे जाणे-येणे तेलंगणात आहे. तेलंगणातील सोयी-सुविधांकडे आकर्षित होऊन सीमेलगतची बहुतांश गावे तेलंगणात जाण्यासाठी इच्छुक आहेत. हाच धागा पकडून बीआरएसने महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे.

यासाठी मागील आठवड्यापासून तेलंगणातील विद्यमानसह माजी लोकप्रतिनिधी नांदेडमध्ये तळ ठोकून आहेत. मुख्यमंत्री केसीआर यांच्या संवाद मेळाव्याची जागा गुरुद्वारा मैदानावर निश्चित झाली आहे. यावेळी अनेकांचा पक्ष प्रवेश होणार असून, त्यानंतर पक्षाची जिल्हा, विभाग व राज्याची कार्यकारिणी ठरणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखरराव यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी सीमावर्ती तालुक्यांमध्ये बैठका सुरू झाल्या असून, अनेक तालुक्यात मंत्र्यांसह कार्यकर्ते भेटी देत आहेत.

दि.२९ जानेवारी रोजी तेलंगण राज्याचे वनमंत्री व कायदामंत्री ए. इंद्रकरण रेड्डी हे नांदेड दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पवित्र सचखंड गुरुद्वाराला भेट देऊन दर्शन घेऊन सभास्थळाची पाहणी केली. कार्यकर्त्यांकडून आढावा घेतला आणि त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नांदेड जिल्ह्यातील नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी भारत राष्ट्र समिती पक्षांमध्ये प्रवेश घ्यावा व उज्ज्वल भारत निर्माण करण्यासाठी केसीआर यांचे हात बळकट करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

तेलंगणातील बसेसची संख्या वाढवून लुभावण्याचा प्रयत्न
तेलंगणा – महाराष्ट्र सीमावर्ती असलेल्या हिमायतनगर येथे मागील दोन महिन्यांपासून तेलंगणा एसटी महामंडळाच्या बसेसची संख्या वाढवण्यात आली. पूर्वी म्हैसा डेपोच्या दोन बस हिमायतनगर येथे येत होत्या. आता सहा बसमध्ये वाढ करण्यात येऊन त्या निर्मल, म्हैसा, हिमायतनगर, उमरखेड, ढाणकीपर्यंत जात आहेत. विशेष म्हणजे या बसेसला महाराष्ट्र एसटी बसच्या तुलनेत ५ टक्के तिकीट दर कमी आहे. बससंख्या वाढवून प्रवाशांना एक प्रकारे लुभावण्याचा प्रयत्न सुरू आहे. या ठिकाणी महाराष्ट्राच्या पूर्वी सहा बस येत होत्या. परंतु किनवट-नांदेड एकच बस सुरू आहे. महाराष्ट्राच्या अबसेस वाढवाव्या अशी मागणी हदगाव -हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी केली होती. मात्र अद्यापही बसेस सुरु नसल्याने प्रवाशी वर्ग तेलंगणा महामंडळाच्या बसेसकडे आकर्षित होत असल्याचे दिसते आहे.

