
अर्धापूर, निळकंठ मदने| मराठी भाषेला मोठी परंपरा आहे. काळाच्या ओघात इतर भाषेचा शिरकाव मराठी भाषेत होत आहे. मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी महाविद्यालयीन पातळीवर भाषा वृद्धिंगत होणाऱ्या स्पर्धा आयोजित करणे आणि भाषा विकसित होणारे उपक्रम राबविल्यास मराठी भाषा संवर्धन होईल असे प्रतिपादन प्रा.डॉ. संतोष हंकारे यांनी केले.

अर्धापूर येथील शंकराव चव्हाण महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा ,अतिथी व्याख्यान ,मराठी वाङ्मयमंडळाचे उद्घाटन या कार्यक्रमानिमित्त त्यांनी प्रमुख व्याख्याते म्हणून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के के पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध हास्य कवी शीलवंत वाढवे, मराठी विभाग प्रमुख डॉ. ल.ना. वाघमारे, डॉ. जे.सी.पठाण, ग्रंथपाल डॉ.मधुकर बोरसे यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना डॉ.हंकारे म्हणाले की, मराठी ही राजभाषा, मातृभाषा आहे. व्यवहारात आचारात विचारात मराठी भाषेचा वापर नियमितपणे केल्यास भाषा समृद्ध होण्यासही मदत मिळते. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. के. के. पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन उपक्रमात सहभागी होऊन आपल्या सुप्त गुणांचा विकास केला पाहिजे. भाषा आणि साहित्य हे दोन्ही महत्त्वाचे अंग असून व्यवहारात मराठीचा वापर केल्यास भाषा वृद्धिगत होत असते असे ते म्हणाले.

मराठी विभागाच्या वतीने भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त हस्ताक्षर, शुद्धलेखन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेचे बक्षीस वितरणही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. ल.ना.वाघमारे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय विद्यार्थिनी वैष्णवी शिनगारे हिने करून दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भितीपत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. उमाकांत शेळकेआणि मराठी वाङ्यमय मंडळाच्या पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ. मंजुषा भटकर यांनी तर आभार प्रा. शरद वाघमारे यांनी मानले.कार्यक्रमास बहुसंख्येने विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

