
नांदेड| प्रेमप्रकरणातून बीएएमएसच्या तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या शुभांगी जोगदंड वय २३ वर्ष या तरुणीची तिच्या कुटुंबातील सदस्यांनी गळा दाबून हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शेतात जाळून टाकला आणि राखही फेकून दिली. ही घटना नांदेड शहरापासून जवळच असलेल्या पिंपरी महीपाल येथे २२ जानेवारी रोजी घडली. दि.२६ जानेवारीला सायंकाळी चार वाजेच्या सुमारास हि घटना उघडकीस आली.

याप्रकरणी पोलिसांनी वडील, काका, भाऊ, मामा आणि एक चुलत भाऊ अशा पाच जणांना अटक केली आहे. दरम्यान, शुक्रवारी (२७ जानेवारी) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भिनी इबिसात देशमुख यांनी आरोपींना सहा दिवस म्हणजेच ३ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत पाठवले. शुभांगी ही नांदेडच्या आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएएमएसचे शिक्षण घेत होती. दिवाळीनंतर तिचे लग्न हाेणार हाेते. पण गावातील नात्यातील एका तरुणासोबत प्रेमसंबंधांमुळे झालेली सोयरीक मोडली गेली.

यामुळे आपली गावात बदनामी झाली या कारणामुळे शुभांगीचे वडील जनार्दन लिंबाजी जोगदंड वय ४८, भाऊ कृष्णा जनार्दन जोगदंड वय १९ आणि इतर नातेवाईक गिरधारी शेषराव जोगदंड वय ३०, गोविंद केशवराव जोगदंड वय ३२ आणि केशव शिवाजी कदम वय ३७ या सर्वांनी मिळून शुभांगीचा २२ जानेवारी रोजी रात्री आपल्याच घरात ओढणीने गळा आवळून खून केला. नंतर तिचा मृतदेह खताच्या पोत्यात टाकून दुचाकीवर आपल्या शेतात नेऊन जाळून टाकला.

प्रजासत्ताक दिनी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास लिंबगाव पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी पिंपरी महीपाल येथील जोगदंड कुटुंबीयांची चौकशी केली. या चौकशीत मुलीची हत्या झाल्याचे उघडकीस आले. रात्री ७ वाजता पोलिसांनी या पाचही जणांना अटक केली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक कोंडिबा बापूराव केसगीर यांनी लिंबगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, तरुणीचे वडील, भाऊ आणि इतर नातेवाईक अशा एकूण ५ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास लिंबगावचे सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पवार हे करत आहेत.

