
नांदेड| देगलूर शहरात असलेल्या एका घरात दरोडा टाकून घरातील चार लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. यावेळी वृद्ध दांपत्याचे दोरीने हातपाय बांधून महिलेची हत्या करण्यात आली. ही घटना दि.२३ जानेवारी रोजी घडली होती. या घटनेचा छडा पोलिसांनी लावला असून, भाच्यानेच मामा-मामीला लुटण्याची टिप दरोडेखोरांना दिली असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली आहे.

नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे उदगीर रस्त्यावरील शास्त्रीनगर भागामध्ये श्रीपतराव रामजी पाटील यांच्या घरावर दरोडा पडल्याची घटना घडली होती. यावेळी त्यांची पत्नी चंद्रकलाबाई श्रीपतराव पाटील यांचे पाय व तोंड कपड्याने बांधून त्यांचा खून करण्यात आला. चोरट्यांनी सोन्या-चांदीचा ३ लाख ८९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी देगलूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांची टीम व स्थागुशा, मुखेड, मरखेल, मुक्रमाबाद पोलिसांचे शोधपथक तयार करण्यात आले होते. कर्नाटक राज्यातील वडगाव औराद, संतपूर येथील जवळपास ९६ तासांचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक बाबींचे विश्लेषण केले.

या पथकांना पोलिस निरीक्षक नानासाहेब उबाळे, पोलिस उपनिरीक्षक दळवी, ओढणे, सिटीकर, सायबर पोलिस स्टेशन यांनी महत्त्वपूर्ण तांत्रिक साहाय्य पुरवले. रवी मुंढे, मोरे व पोलिस नाईक सुनील पत्रे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीअधारे सीसीटीव्हीमधील आरोपींची ओळख पटवून गुन्हेगार निष्पन्न केले आहेत. मृत चंद्रकलाबाई श्रीपतराव पाटील यांच्याबाबत त्यांचा भाचा शहाजी मरतळे याने अन्य आरोपींना माहिती दिली. त्यानंतर आरोपींनी गुन्ह्याचे नियोजन करून, घराची रेकी करून चंद्रकलाबाई श्रीपतराव पाटील यांचा खून करून त्यांच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिने व मोबाइल असा मुद्देमाल जबरीने चोरून नेला असल्याचे कबूल केले आहे. गुन्ह्यात आरोपी विठ्ठल व्यंकट बोईनवाड, गौतम दशरथ शिंदे, शेषराव माधवराव बोईनवाड ( तिघेही रा. वसूर, ता. मुखेड), बालाजी पंढरी सोनकांबळे, (रा. मंग्याळ, ता. मुखेड), शहाजी श्रीराम मोरतळे ( रा. मोरतळवाडी, ता. उदगीर) यांना अटक करण्यात आली, असे पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

बियाणी खून प्रकरणातील मारेकऱ्यांना ताब्यात घेणार बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या मारेकऱ्याला तीन दिवसांपूर्वी एनआयएने दीपक सुरेश रंगा याला पकडले. तसेच यापूर्वी त्याच्या सोबतच्या दुसऱ्या अल्पवयीन असलेल्या मारेकऱ्याला पकडण्यात आले आहे. त्याचे वय तपासून त्याला तसेच दीपक रंगा याला एनआयएची कस्टडी संपल्यावर ताब्यात घेण्यात येईल. दोन दिवसांपूर्वी नांदेडचे पथक जाऊन चौकशी करून आले आहे, असे पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले.

कुख्यात गुन्हेगार बियाणी खून प्रकरणातील मुख्य आरोपी हरविंदरसिंग रिंदा पाकिस्तानमध्ये असल्याचा संशय भारतीय तपास यंत्रणेला आहे. काही दिवसांपूर्वी तो मृत झाल्याची बातमी आली होती. त्यानंतर मागील आठवड्यात त्याने स्वत: एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या सर्व घटनाक्रमाचा तपास यंत्रणेकडून बारकाईने केला जात आहे, असेही पोलिस अधीक्षक कोकाटे म्हणाले.

