
नांदेड| तालुक्यातील पिंपरी महिपाल येथे एका उच्चशिक्षित तरुणीची तिच्याच आई- वडील व नात्यातील लोकांनी तिची हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकला शिवाय तेथील राख आणि अस्थींचे विसर्जन केले. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावणारी असून निश्चितपणे या घटनेतील आरोपींना फासावर लटकवण्यासाठी पोलीस प्रशासनान व महाराष्ट्र राज्याचा गृह विभाग काम करेल, असा विश्वास व्यक्त करतानाच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी केली आहे.

पिंपरी महिपाल येथील शुभांगी जोगदंड खून खटला प्रकरणाबाबत सौ.प्रणिताताई देवरे यांनी आज नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेतली. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ.सौ.शितलताई भालके, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष सौ.चित्ररेखाताई गोरे, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सरचिटणीस अनुराधाताई गिराम यांची उपस्थिती होती. या भेटीत त्यांनी या विषयावर चर्चा केली.

त्यानंतर माध्यमांशी बोलताना सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर म्हणाल्या की, राज्यात मुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर निश्चितपणे या राज्यात महिला व मुलींवर होणाऱ्या अन्याय अत्याचारात मोठी घट झाली आहे. उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात दक्ष आहे. कोणत्याही प्रकारच्या दुर्दैवी घटना घडणार नाहीत यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. त्यामुळे राज्यासह नांदेड जिल्ह्यातील महिला आणि तरूनिंवरील अत्याचाराच्या घटना घटनांमध्ये मोठी घट झाली आहे.

नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या कार्यकाळापासून नांदेड जिल्ह्यातील तरुणी आणि मुलींच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना करण्यात आलेले आहेत. खाजगी क्लासेस आणि मुलींच्या वस्तीगृह परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे परंतु तो अधिक वाढवावा. साध्या वेशातील पोलिसांना बंदोबस्तावर ठेवून टारगट मुलांना अद्दल घडवावी . त्यांचा बंदोबस्त करावा . पोलिसांची महिलांसाठी असलेली 102 ही हेल्पलाईन अधिक व्यापक करावी. तिची प्रसिद्धी करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे . पिंपरी महिपाल येथील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना करत असतानाही शुभांगी जोगदंड हीची घडलेली घटना खरे तर आत्मचिंतन करावयास लावणारी आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणीही राजकारण न करता माणुसकीच्या दृष्टिकोनातून विचार करावा.

भविष्यात शुभांगी जोगदंड सारखे कोणतेही घटना घडणार नाहीत. यासाठीही प्रशासनाने दक्ष राहावे असेही त्या म्हणाल्या. या प्रकरणाची जेव्हा पोलिसांना माहिती मिळाली त्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि नांदेड पोलिसांनी या घटनेत गांभीर्याने लक्ष देऊन आरोपींना तात्काळ अटक केली आहे. आता या प्रकरणाचा अधिक गतीने तपास करून लवकरात लवकर न्यायालयात दोषारोपत्र दाखल करावे. आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

