
नांदेड/बिलोली। तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्राच्या सिमावर्ती भागातील गावांचा विकास करा या मागणीसाठी सुरू असलेल्या प्रश्न सिमावर्ती भागाचे या समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने बिलोली,देगलुर,धर्माबाद सह तेलंगणाच्या सिमावर्ती भागातील प्रश्नांबाबात बैठक घेऊन १५ फेब्रुवारी पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बिलोली,देगलुर,धर्माबाद,किनवट,भोकरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

जिल्ह्यातील बिलोली,देगलुर,धर्माबाद किनवट आदी तालुक्यांच्या सिमेपलिकडील तेलंगणा राज्यातील सरकार तेथील शेतकऱ्यांना २४ तास मोफत विज,पेरण्यांसाठी अनुदान,विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण,गावागावातील प्रशस्त रस्ते,उत्तम आरोग्य सुविधेसह आपल्या राज्यातील नागरिकांना अनेक सोई सुविधा उपलब्ध करून देत असताना महाराष्ट्राच्या सिमावर्ती भागातील नागरिकांना रस्ते,विज,शिक्षण आरोग्य आदींसाठी शासन व प्रशासनाकडे अनेकवेळा मागणी करूनही मुलभूत सोई सुविधा उपलब्ध होत नसल्याने बिलोली तालुक्यातील काही जनांनी प्रश्न सिमावर्ती भागाचे ही चळवळ सुरू केली.या चळवळीच्या माध्यमातून सिमावर्ती भागातील नागरिकांच्या समस्यां शासन व प्रशासनाकडे प्रभावीपणे मांडण्यात आल्या.

या चळवळीची तत्कालीन अधिकारी व लोकप्रतिनीधींनी दखल घेऊन काही बैठका घेतल्या. आता पुन्हा प्रश्न सिमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक गोविंद मुंडकर, समन्वयक एस.एस जाधव,गंगाधर प्रचंड,तात्या देशमुख,राजु पाटील, शंकर बाभळीकर आदींनी २८ डिसेंबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला होता.लाक्षणिक उपोषणाच्या इशाऱ्या नंतर प्रशासनाने दि.५ जानेवारी २०२३ रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले होते.

माञ शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक आचारसंहीतेमुळे ५ जानेवारी रोजीची बैठक रद्द करण्यात आली होती.दि.३० जानेवारी रोजी शिक्षक मतदार संघासाठी मतदान पार पडल्यामुळे दि.३१ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी आभिजीत राऊत यांच्या उपस्थित घेण्यात आलेल्या बैठकीत येत्या १५ फेब्रुवारी पर्यंत आपल्या स्तरावर सिमावर्ती भागातील समस्यांबाबत बैठक घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राऊत यांनी बिलोली,देगलुर,धर्माबाद,किनवट,भोकरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

