
हदगाव/तामसा, गजानन जिदेवार। तामसा भागात नांदेड आणि बळेगावच्या नदीच्या वाळूची बाराही महिने पोलिसांच्या नाकावर टिच्चून दर दिवशी वाळूच्या किमान 50 हायवा गाड्या वाळू तामस्यात विक्रीसाठी येत असल्या तरी कारवाईच्या नावाने नुसती बोंबाबोंब आहे.

अवैध वाळू वाहतूकीपोटी शासनाचा मोठा महसूल बुडत आहे. पण स्वतःचे उखळ पांढरे करणाऱ्या महसूल अधिकारी आणि पोलिसांना काहीच घेणेदेणे राहीले नाही. यावर कारवाई करण्यासाठी संबंधितांकडूनही ठोस पावले उचलली जात नसल्याने तामसा भागातील विनापरवाना वाळू वाहतुकीला अभय तरी कोणाचे? असा प्रश्न यानिमित्ताने विचारल्या जात आहे.

स्थानिक पोलीस प्रशासच्या अर्थपूर्ण अभयाने तामसा भागात अवैध वाळू वाहतूक व विक्रीचा धंदा बाराही महिने बिनधास्त आणि बेलगामपणे चालतो, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. रात्रीची खेळ चाले म्हटल्याप्रमाणे दररोज किमान 50 हायवा गाड्या वाळू तामसा भागात विक्रीसाठी येते. स्थानिक पोलीस व महसूल प्रशासनाला हाताशी धरून परगाडी मोठया रक्कमेचा हप्ता ठरविण्यात आल्याचे वाळू गाडीवाल्याकडूनाच उघडपणे सांगण्यात येत असल्याने वाळूच्या धंद्यात सगळं काही ओक्के… ओक्के…. चालू आहे. वाळूच्या गाड्यांचा हिशोब व हप्ते वसुलीसाठी पोलीस ठाण्याच्या एका खास कर्मचाऱ्याची नियुक्ती असल्याची चर्चा आहे. त्यामुळे वाळू विक्रीचा धंदा निडरपणे आणि सोयीस्कर चालतो हे मात्र निश्चित!

त्याचबरोबर वाळू वाहतुकीला महसूल किंवा पोलिसांचा अडथळा येऊ नये म्हणून काही एजंट देखील नेमले असल्याचे समजते. मागील आठवड्यातच येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तामसा नवीन बसस्थानक परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारे दोन हायवा थांबवून पोलिसांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली होती. परंतु गाड्यावर कारवाई करण्यासाठी कोणी आले तर नाहीच. उलट गाडी चालकांनी पोलिसांना हप्ते पोहचल्याचे बेंबीच्या देठापासून सांगितल्याने कुंपणच शेत खात असल्याचे ऐकायला आल्याने तेथे उपस्थितांच्या अक्षरशः भोवया उंचावल्या होत्या. परिणामी पोलीसांच्या कर्तव्याची लक्तरे वेशीवर टांगल्याची दुसरे दिवशी शहरात दिवसभर चर्चा सुरू होती.

उल्लेखनीय बाब म्हणजे, अवैध वाळू वाहतूकीवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पोलीस, परिवहन, महसूल विभागाचे अधिकाऱ्यांचा समावेश असलेले जिल्हास्तरीय संयुक्त पथक तैनात केले आहे. मात्र त्या पथकाचा ईकडे कसलाही प्रभाव पडत नाही. त्यामुळे हे पथक वाळू वाहतुकीला अभय देणारे पथक बनले की काय? असा संतापजनक प्रश्न अनेकांना पडला आहे.

