उस्माननगर, माणिक भिसे। उस्माननगर ( ता कंधार) येथील बोल्हाई प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ. नलिनीबाई विश्वासराव लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी दिल्या जाणाऱ्या “मातृस्पर्श आई गौरव “सोहळ्यात गुरुवारी दि. २ फेब्रुवारी रोजी दुपारी येथील आदर्श पिढी घडविणाऱ्या शिक्षिका सौ.उर्मिलाबाई नारायण पांचाळ यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात येणार आहे. यावर्षीच्या प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या या पुरस्काराच्या मानकरी मातृह्दयी शिक्षिका सौ. उर्मिला नारायण पांचाळ आहेत.
बालकांचं भावविश्व ओळखून उत्कृष्ट संस्कार क्षम पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यात हातखंडा असणाऱ्या उर्मिला ताईंनी गावातील कुठलाही भेदभाव न करता बालवाडी मध्ये येणाऱ्या चिमुकल्या बाळांना शिक्षणाची गोडी लावली आहे.
१९९३ ते ९५ काळात विशाखा जहागीरदार यांच्या समवेत बालवाडी मध्ये सहकारी म्हणून पांचाळ ताईंनी ज्ञानदानाचे कार्य सुरू केले. १९९६ पासून स्वतंत्र स्वतः ची बालवाडी काढून आजतागायत लहान मुलांना चांगल्या गोष्टी शिकवण्या बरोबर उजळणी, बडबड गिते, शिस्त, वक्तशीरपणा, सामुदायिक सहजीवन, शाळेत जाण्याची गोडी निर्माण करण्याचे कसब वाखाणण्याजोगे आहे. दरवर्षी सुमारे २० ते २५ बालके मुले ,मुली अतिशय अल्प प्रमाणात पैसे देऊन शिक्षण घेतात हे विशेष.
शिक्षण क्षेत्रात पूर्व प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या चिमुकल्या बालकांचा मुळ शैक्षणिक पाया पक्का करण्यात परिश्रम घेऊन पालकांच्या आदरास पात्र ठरणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून उर्मिलाताईंकडे पाहिले जाते.
यावर्षीच्या मातृस्पर्श आई गौरव पुरस्कार देऊन या मातेचा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
गावातील श्री शारदा वाचनालय शिवमंदिर प्रांगणात दुपारी तीन वाजता होणाऱ्या या मातृस्पर्श आई गौरव सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठान चे सचिव गणेश लोखंडे, प्रदिप देशमुख, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष माणिक भिसे, सूर्यकांत माली पाटील, विठ्ठल ताटे पाटील, लक्ष्मण कांबळे, लक्ष्मण भिसे, संभाजी काळम, देविदास डांगे, दिपक लोखंडे, रुद्रेश्वर कागदे, अण्णासाहेब सुपेकर, आदींनी केले आहे.