
किनवट, माधव सूर्यवंशी। ग्रामविकासात सर्वात व अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे लोकसहभाग अर्थातच त्या गावातील जनतेचे सहकार्य महत्वाचे असते. याशिवाय ग्रामीण विकास साधने तितके शक्य नसते, यासाठी ग्रामविकासात प्रत्येक गावकर्याने स्वतः गावाचे काही तरी देणे लागतो, या उद्देशाने सहभाग नोंदवून ग्राम विकास साधावा असे मत एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश जोशी यांनी व्यक्त केले.

किनवट येथील राजे शिवाजी गार्डन घोटी येथे आयोजित एचडीएफसी बँकेच्या सीएसआर निधी व कार्ड संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गाव विकास समिती सक्षता बांधणी व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या ठिकाणावरून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकल्प व्यवस्थापक डी.व्ही. पवार हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शिवाजी गायकवाड, कार्ड संस्था भोपाळचे माजी वरिष्ठ अधिकारी एस.डी. शर्मा यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना डॉ. जोशी म्हणाले की, ग्राम विकास करण्यासाठी राजकारण बाजूला ठेऊन कार्ड संस्थेने ठरवून दिलेल्या ग्राम विकास संस्थेच्या माध्यमातून गावाचा विकास कसा साधला येईल, याचा विचार प्रत्येक तरूणाने करणे आवश्यक आहे. राजकारणापुरते राजकारण करून तरूणांनी कार्ड संस्थेने आखुन दिलेल्या योजनांचा गावविकासासाठी पुर्णतः संधी साधून गाव विकासाची वज्रमुठ बांधणे आवश्यक असल्याचे सांगितले. आजमतीला किनवट हा भाग आदिवासी भाग म्हणून मोठ्या प्रमाणात ओळखला जातो.

विकास कामापासून कोसोदूर असणारा हा भाग कुठेतरी विकासासाठी एकत्रीत येणे आवश्यक आहे. यासाठी सेंटर फॉर अॅड्व्हान्स अॅन्ड डेव्हलपेन्ट (कार्ड) भोपाळ, मध्यप्रदेश संस्थेच्यावतीने आज आपल्या भागाचा ग्राम विकास करण्यासाठी ही संस्था 24 तास कार्यरत झाली आहे. गावामध्ये पाणी, शिक्षण, आरोग्य, कृषी, महिला विकास, पर्यावरण या आदी घटकांवर मोठ्या प्रमाणात कार्य उभे करणे आवश्यक आहे.

यासाठी कार्ड संस्था आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असून आपण आपला ग्रामविकास कसा साधता येईल, यावर भर देणे आवश्यक आहे. गावाच्या विकासासाठी आपण काही तरी देणे लागतो ही भावना लक्षात घेऊन प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचेही जोशी यांनी सांगितले. तर प्रत्येकाची जबाबदारी गावातील समस्या ह्या कशा सोडवता येतील व आपले गाव समृद्ध कसे करता येईल, यावर भर देणे महत्वाचे असल्याचे डॉ. शिवाजी गायकवाड यांनी सांगितले.

गावाच्या विकासासाठी व आपल्या शेती व्यावसायासोबत शिक्षण, आरोग्य, जलसंधारण या कामासाठी सदैव आपल्यासाठी तयार असल्याची भुमिका कार्डचे प्रकल्प व्यवस्थापक डी.व्ही. पवार यांनी व्यक्त केली. यामध्ये आंबाडी तांडा, सिरमेठी, भीमपूर, पिंपळगाव, तलईगुडा, वडोली, मलकापूर, गणेशपूर, राजगड (गाव), राजगड तांडा, भिलगाव, निचपूर, धमनदरी व कमटळा आदी गावातील ग्रामस्थ सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी.व्ही. पवार यांनी केले तर सुत्रसंचालन प्रियंका मेश्राम व आभार रूपाली वाटगुळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अभिषेक चिरडे, प्रविण सोनटक्के, सुजाता वडपत्रे, सर्व गाव परिवर्तन आदींनी परिश्रम घेतले.

