
बुलडाणा। वृत्तपत्र विक्रेता हा वृत्तपत्र व्यवसायातील एक महत्वाचा घटक आहे. थंडी, वारा, पाऊस व सुखः दुःखात सुध्दा अनेक अडचणींवर मात करीत मध्यरात्रीनंतर भल्या पहाटेपासून वृत्तपत्र वाचकांच्या घरोघरी पोहोचविण्याचे काम करणारा हा कष्टकरी घटक आहे या सामान्य घटकाचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घडवून आणू, मुख्यमंत्र्यांसह विधानसभेतही विक्रेत्यांच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी दिले.

बुलडाणा येथे महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात अध्यक्ष पदावरून ते बोलत होते. यावेळी उद्घाटक म्हणून बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्यामजी चांडक यांच्यासह राज्य संघटनेचे अध्यक्ष सुुनिल पाटणकर, कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी, कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार, सल्लागार शिवगोंड खोत, केंद्रीय कार्यकारणी सदस्य संजय पावसे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

बुलडाणा येथे 26 व 27 जानेवारी या दोन दिवसात महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न झाले. 27 जानेवारी रोजी पहाटे 5 वा. सकाळी 4 वाजता बालयोगी वरद संतोष जोशी जालना यांचे योग शिबिर पार पडले. त्यानंतर बुलडाणा शहरातून वृत्तपत्र दिंडी काढण्यात आली. अकरा वाजता जाहीर अधिवेशन सुरू झाले. बुलडाणा जिल्हाध्यक्ष तथा राज्य कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जिल्ह्यात संघटनेची मुहूर्तमेढ रोवणारे दयासागर महाले यांचे अधिवेशनाचे स्वप्न साकार झाल्याचे सांगितले.

अधिवेशनाचे उद्घाटक, बुलडाणा अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक म्हणाले की, वाचकांच्या प्रत्येक घडामोडीशी विक्रेत्यांचा सबंध येतो. त्यामुळे विक्रेत्यांनी समाजाच्या सुखदुखात सहभागी होवून त्यांचे घटक व्हावे व मोठी स्वप्ने बघावी. शुन्यातुन विश्व निर्माण करणार्यांचा आदर्श घेऊन काम करावे. अध्यक्ष सुनिल पाटणकर यांनी संघटनेच्या आजपर्यंतच्या कामाची माहीती देत शासनाने वृत्तपत्र विक्रेत्यांचे कल्याणकारी मंडळ तात्काळ करावे अशी मागणी केली. कार्याध्यक्ष बालाजी पवार यांनी संघटनेचे महत्व पटवून देत प्रत्येक वृत्तपत्र विक्रेत्याने संघटनेचे सदस्यत्व घ्यावे. संगठीत व्हावे असे आवाहन केले.

सरचिटणीस विकास सूर्यवंशी यांनी कल्याणकारी मंडळासाठी आजपर्यंत केलेल्या पाठपुराव्याचा आढावा घेत शासनावर कोणताही आर्थिक बोजा नसणारे व लोकशाहीतील महत्वाचा स्तंभ समजल्या जाणार्या वृत्तपत्र क्षेत्रातील प्रत्येक घटकाच्याच्या कल्याणासाठी तात्काळ कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली. या शिवाय शिवगोंड खोत, रघूनाथ कांबळे, सचिन चोपडे, विनोद पन्नासे, संतोष शिरभाते, गोपाळ चौधरी आदींनीही मनोगत व्यक्त केले. आभार राजेश तायडे यांनी मानले. अधिवेशनास राज्य संघटनेचे सर्व उपाध्यक्ष, संघटन सचिव, कार्यकारी सदस्य व विविध जिल्ह्याती वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकार्यांसह वृत्तपत्र विक्रेते-एजंट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकाश उन्हाळे, राहुल डिडोळकर, माधव देशमुख, ज्ञानेश्वर इंगळे, विशाल एडसकर, संतोष गाडेकर, उमेश देशमुख, रविंद्र चिंचोळकर, जगदिश कोथळकर, श्रीकांत चौधरी, किशोर लाडूकर, दीपक मानकर, रामेश्वर गोरले, संजय स्वामी, अतुल देशमुख, अनिकेत फोकमारे, वैभव वाघमारे, राजू चिंचोळकर, विशाल मिसाळ, संजय जैन, शरद उबाळे, संतोष खेडेकर यांनी अथक परिश्रम घेतले.

पाच मुद्यांवर काम करणार संघटना, पदाधिकार्यांनी घेतली जबाबदारी
दि 26 जानेवारी रोजी दुपार नंतर राज्यातील सर्व भागातुन विक्रेत्यांचे आगमण झाले. सायंकाळी केंद्रीय व्यवस्थापन समितीची बैठक व त्यानंतर रात्री आमसभा संपन्न झाली.संघटनात्मक बांधणी, शासनाकडुन कल्याणकारी मंडळ जाहीर व्हावे, संघटनेचे स्वनिधीतुन कल्याणकारी योजना गतीमान करणे, संघटनेचे आर्थिक नियोजन करणे, शहर व ग्रामिण भागातही एकसारखे कमिशन, पुरवणी भरणावळ मिळावे या पाच कार्यक्रमावर आगामी काळात काम करण्याचा निर्धार करण्यात आला. या प्रत्येक कामासाठी पदाधिकार्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली. या अधिवेशनाला नांदेड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वृत्तपत्र विक्रेते सहभागी झाले होते.
