
उस्माननगर,माणिक भिसे। मुलगाच पाहिजे हा हट्ट न करता मुलगा असो की मुलगी त्यांना चांगले शिक्षण , चांगले संस्कार देऊन त्यांना सुसंस्कृत देऊन संस्कार देणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन विचारवंत तथा वक्ते रमेश पवार यांनी केले.

लोहा तालुक्यातील पोखरभोसी येथे दि.३१ जानेवारी रोजी राष्ट्रमाता, राजमाता माॅसाहेब जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसिद्ध विचारवंत तथा वक्ते रमेश पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श शिक्षिका सौ. ज्योती शिंदे या होत्या..तर प्रमुख वक्ते म्हणून शिव फुले-शाहू-आंबेडकर, अण्णाभाऊ चरित्राचे अभ्यासक,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ बहीशाल शिक्षण केंद्राचे प्रसिद्ध व्याख्याते रमेश पवार यांची उपस्थिती होती.प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हरी मुळे, श्री शेख, सरपंच मिराताई गिरी जिजाऊ ब्रिगेडच्या माजी जिल्हाध्यक्षा मनकर्णाताई ताटे, भगवानराव ताटे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता, राजमाता माॅसाहेब जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस व कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जिजाऊ वंदनेने झाली. गावातील बाल चिमुकल्या विद्यार्थानी दैवत छत्रपती या गाण्यावर सुंदर सामुहिक नृत्य सादर केले. जिजाऊ- सावित्रीच्या वेशभूषेत काही मुली बसलेल्या होत्या.प्रसिद्ध वक्ते, लेखक साहित्यिक रमेश पवार यांनी माॅसाहेब जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरित्रावर आपल्या व्याख्यानातून प्रकाश टाकताना हल्लीच्या जिजाऊ सावित्रीने काय शिकावे यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

जिजाऊ सावित्री चरित्रातून मुलांनवर कोणते संस्कार स्त्रियांनी करावे, शुरपणा, वीरत्व, स्वाभिमानीपणा, जिद्द, कष्ट, त्याग, समर्पण शिकुन आपली संतती ही समाजाची पर्यायाने राष्ट्राची संपत्ती ठरावी हा उपदेश देवून गोड रसाळ वाणीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले तर प्रमुख पाहुणे हरी मुळे यांनी आपल्या मनोगतात गावची शाळा ही देशाच्या विकासाचा केंद्रबिंदू असून मुलांकडे पालकांनी जातीने लक्ष देवून उच्च शिक्षण द्यावे असे सांगितले.

अध्यक्षीय समारोप करताना सौ.शिंदे यांनी पालकांनी विशेषता मातांनी मुला-मुलींच्या आरोग्यदायी चांगल्या सवयीकडे विशेष लक्ष द्यावे असे सांगितले. या कार्यक्रमात रांगोळी, भाषण स्पर्धेतील गावातील प्रज्ञा प्रतिभावंत विद्यार्थी स्काॅलरशिप, एसएमएस परिक्षा,दहावी, बारावीतील यशवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवानिवृत्त मुख्याध्यापक भगवानराव ताटे यांनी मांडले तर कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन प्रकाश ताटे यांनी तर आभार प्रदर्शन गोविंद विश्वनाथ ताटे यांनी मानले तर कार्यक्रम यशस्वितेसाठी शिक्षक मित्र मंडळीनी परिश्रम घेतले.

