
मुख्यमंत्री मा.ना.श्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा.ना.श्री देवेंद्रजी फडणवीस सरकारचे खा. हेमंत पाटिल यांनी मानले आभार

हिमायतनगर। पैनगंगा, नदीवरील सात उच्च पातळी बंधाऱ्यांना मंजुरी देण्यात यावी यासाठी १२ जानेवारी २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. या बैठकीत तात्काळ या सात बंधाऱ्यांना मंजुरी देऊन एक महिन्यात राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समीतीकडून मान्यता देण्याचे निर्देश मुख्यमंत्री मा.ना.श्री एकनाथजी शिंदे यांनी संबंधित विभागाला दिले होते. त्यावर तातडीने कार्यवाही करत जलसंपदा विभागाने यास मान्यता दिली आहे.

हदगाव तालुक्यातील पांगरा, बनचिंचोली,गोजेगाव, हिमायतनगर तालुक्यातील घारापूर,किनवट तालुक्यातील किनवट आणि मारेगाव तर माहूर तालुक्यातील धनोडा या सात गावांचा समावेश आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. हे प्रकल्प हिंगोली लोकसभा मतदार संघात समावेशीत असलेल्या नांदेडसह यवतमाळ जिल्ह्यातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनासाठी लाभदायक ठरणार आहेत. यामुळे १० हजार ६१० हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण होण्यास मदत होणार आहे.

त्यामुळे नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील सातत्याने टंचाईग्रस्त असणाऱ्या आदिवासी तालुक्याचा सिंचनाचा व दोन्ही जिल्ह्यातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पाला अंदाजित १६०० कोटी रुपये खर्च होणार असून प्रति वर्षी ५०० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. चार वर्षांत हे प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचा विदर्भातील पुसद, उमरखेड, महागाव या तालुक्यासह मराठवाड्यातील कळमनुरी, हदगाव, हिमायतनगर, माहूर, किनवट या तालुक्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे.

