
तामसा/हदगाव, गजानन जिदेवार। हदगाव तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून अवैध धंद्यांना उधाण आल्याचे चित्र दिसून येत आहे. तामसा शहरासह गावागावात खुलेआम दारू, गुटख्याची विक्री होत आहे.

तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर असणाऱ्या ढाब्यांतूनही बेकायदेशीरपणे दारूची विक्री होत आहे. मात्र सर्वच प्रशासकीय यंत्रणेचे सोयीस्कर दुर्लक्ष झाले असून, दिवसेंदिवस अवैध धंदे फोफावत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्यात भरमसाट बेकायदा धंदे सुरू असल्याचे दिसून येत होते.मात्र वर्षभरापासून तालुक्यात पुन्हा एकदा बेकायदा धंदेवाल्यांनी तोंड वर काढले आहे. हदगाव शहरात व तामसा शहरात तसेच ग्रामीण भागात सुद्धा बेकायदेशिर धंदे दिवसेंदिवस जोमाने सुरु असल्याचे चित्र आहे.

तामसा शहरातील ग्रामीण भागात काही टपऱ्यांवर खुले आमपणे दारूची v गुटखा विक्री होत आहे. शहराबरोबर राज्य महामार्गाच्या धाब्यावर देशी दारू, बियर विनापरवाना विक्री सुरू असताना सोबत मटका ,जुगार , गुटखा या धंद्यांनी सुद्धा जोर धरला आहे.तसेच वाळकी फाटा व तामसा येथे मोठ्या प्रमाणात खुले आम मटका चालतो. इतर ठिकाणी असलेल्या ढाब्यांवर देखील खुलेआम पणे बेकायदा दारूची विक्री होत आहे. काही गावात बेकायदा दारू विक्रेत्यांनीही परिसरात चांगलेच बस्तान बसवल्याचेही चित्र आहे.

बेकायदा दारू विक्रीबरोबरच गुटखा, ही बेकायदेशीरपणे विक्री होत आहे. अनेक गावांत काही पानटपऱ्या, किराणा दुकानातून गुटख्याची खुलेआमपणे विक्री केली जात आहे. बेकायदेशीरपणे होणाऱ्या दारू, आणि गुटख्याच्या विक्रीचे दरही बेकायदेशीर आहेत. दीडपट ते दुप्पट दराने याची खुलेआमपणे विक्री होत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यांवर बेकायदेशीर धंदे खुलेआमपणे सुरु असताना कारवाई झाल्याचे चित्र कोठेचे दिसून येत नाही.

संबंधित गावची बेकायदा धंद्यांची माहिती असून देखील सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे.ग्रामीण भागात अवैद्य धंद्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा धंदेवाल्यांवर कोणाचीच जरब नसल्याचे चित्र आहे. एकूणच या साऱ्या प्रकारामुळे अवैध व्यवसाय जोमात असल्याचे दिसत आहे. यामुळे गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. याला लगाम घातला जावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे. त्यामुळे अवैध धंद्यांना लगाम घालणार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

