
नांदेड| मान्सून उशिरापर्यंत लांबल्यामुळे रब्बी हंगामाची उशिराने पीक पेरणी झाली. तसेच जिल्हा पातळीवरुन रब्बी हंगामात ई-पीक पेरा नोंदविण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. ही मागणी मान्य करून शासनाने मोबाईल अॅपद्वारे पीकपेरा नोंदणी करण्यास बुधवार 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापुर्वी रब्बी हंगाम 2022-23 मध्ये ई-पीक पाहणी नोंद करण्याची मुदत 31 जानेवारी 2023 पर्यंत देण्यात आली होती.

ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-पीक पेरा नोंद केली नाही, अशा शेतकऱ्यांनी आपल्याकडील स्मार्टफोनद्वारे ई-पीक पाहणी नोंद करावी. यासाठी गावातील तलाठी, कृषी सहायक, पोलीस पाटील, रोजगार सेवक, स्वस्त धान्य दुकानदार, कोतवाल, शेतीमित्र, प्रगतीशील शेतकरी, आपले सरकार केंद्र चालक, संग्राम केंद्र चालक, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, तरुण मंडळांचे प्रतिनिधी अशा स्वंयसेवकांचे सहकार्य घ्यावे.

पात्र शेतकऱ्यांना विविध शेती विकासाच्या योजनांचा लाभ सुलभतेने मिळणेस्तव,पीक कर्ज,पीक विमा नुकसान भरपाई ,नैसर्गिक आपत्ती काळात सुयोग्य शासकिय मदत मिळण्यासाठी ई-पीक पेरा नोंद गरजेची आहे.त्यामुळे अॅप द्वारे ई-पीक पाहणी नोंद करणे शिल्लक असलेल्या उर्वरीत सर्व शेतक-यांनी मोबाईल अॅपमध्ये अचूक पीक पेरा नोंद करावी असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

