
हिमायतनगर। तालुका हा बऱ्याच क्षेत्रात इतर तालुक्यांपेक्षा विकासापासून कोसो दूर राहिला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातून येत असतात परंतु तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी येत असताना त्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे.

खेड्यापाड्यात अजूनही पक्के रस्ते नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ये जा करत असताना खूप अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास ग्रामीण भागाचा तालुक्यापासून संपर्क तुटत असतो त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

हिमायतनगर शहरात सामाजिक न्याय विभागाच्या वतीने 500 विद्यार्थी संख्या राहील अशा स्वरूपाचे शासकीय वस्तीगृह मंजूर करुन मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क अबाधित ठेवावा. अशी प्रमुख मागणी उपसरपंच सरपंच संतोष आंबेकर यांनी थेट मुख्यमंत्री श्री. एकनाथराव शिंदे साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

यासह तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेसाठी अर्ज केलेल्या अर्जदारांचे अर्ज निकाली काढून त्यांना स्वतःची पक्की घरे देण्यात यावी, हिमायतनगर तालुक्यातील मौजे खैरगाव- मंगरूळ च्या मार्गावरील पुल खुपच कमी उंचीचा असल्यामुळे पावसाळ्यात गावांचा तालुक्यापासून संपर्क तुटतो त्यामुळे या पुलाची उंची वाढवुन नविन पुलास मंजुरी द्यावी या मागण्यांचा समावेश आहे. जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत पाठपुरावा करत राहील आणि विकासकामांसाठी सदैव कटिबद्ध असेल अशीभावना यावेळी श्री. आंबेकर यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली.

