Friday, March 31, 2023
Home धार्मिक भारतात मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रम शिकवण्याची आवश्यकता – अशोक जैन, अध्यक्ष, पद्मालय देवस्थान, जळगाव -NNL

भारतात मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रम शिकवण्याची आवश्यकता – अशोक जैन, अध्यक्ष, पद्मालय देवस्थान, जळगाव -NNL

जळगाव येथे राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’ला प्रारंभ !

by nandednewslive
0 comment

जळगाव| मंदिरांपासून धर्म वेगळा करता येत नाही. कोणतीही संस्था सुदृढ होणे, हे व्यवस्थापनावर अवलंबून असते; मात्र मंदिराच्या व्यवस्थापनाविषयी कोणताही अभ्यासक्रम भारतात शिकवला जात नाही. मंदिर परिषदेच्या माध्यमातून हे कार्य होत आहे. तीर्थक्षेत्र आणि मंदिरे यांच्या प्राचीन परंपरा आहेत. ती पर्यटनस्थळे नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे. मंदिरांच्या विश्वस्तांनी मंदिरांकडे पालकत्वाच्या भावनेने पहाणे आवश्यक आहे. विश्वस्तांनी हातात हात घालून मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी एकत्र यायला हवे. या दृष्टीने मंदिर परिषदेच्या माध्यमातून मंदिरांविषयीचा समान कार्यक्रम निश्चित होईल, असा विश्वास जळगाव येथील श्री पद्मालय गणेश देवस्थानचे विश्वस्त, तसेच जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री. अशोक जैन यांनी व्यक्त केला.

हिंदु जनजागृती समिती आणि श्री गणपति मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळ, पद्मालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंदिरे आणि धर्मपरंपरा यांच्या रक्षणार्थ दोन दिवसीय राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून या ऐतिहासिक मंदिर परिषदेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर काशी येथील ज्ञानव्यापीसाठी लढा देणारे सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन, श्री काळाराम मंदिराचे आचार्य महामंडलेश्वर महंत श्री सुधीरदासजी महाराज, देऊळगावराजा येथील श्री बालाजी देवस्थानचे श्री. विजयसिंहराजे जाधव, सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे उपस्थित होते.

राज्यभरातील विविध मंदिरांचे 250 हून अधिक प्रतिनिधी या मंदिर परिषदेत सहभागी झाले आहेत. ‘मंदिर प्रतिनिधींच्या एकत्रीकरणाची आवश्यकता’, ‘पुजार्‍यांच्या अडचणी आणि उपाय’, ‘मंदिरांच्या माध्यमातून हिंदूंचे संघटन’, ‘मंदिरांचे सुप्रबंधन’, ‘प्राचीन मंदिरांचा जीर्णाेद्धार, स्वच्छता, आर्थिक अडचणी’, अशा विविध विषयांवर या परिषदेत उहापोह होत आहे. या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी प्रस्तावना करतांना मंदिर परिषदेचे आयोजन हिंदूंसाठी शुभकल्याणकारी घटना आहे, असे प्रतिपादन केले. या परिषदेला भाजपचे स्थानिक आमदार श्री. सुरेश भोळे हेही उपस्थित होते. या वेळी मत व्यक्त करतांना आमदार श्री. भोळे म्हणाले, ‘‘न्यायालयात भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेण्यास सांगितले जाते; मात्र शाळा, महाविद्यालयांमध्ये भगवद्गीता शिकवली जात नाही. ही स्थिती पालटणे आवश्यक आहे.’’

मंदिरांतील धर्मपरंपरांच्या रक्षणार्थ मंदिर विश्वस्तांचे संघटन व्हायला हवे ! – महंत श्री सुधीरदासजी महाराज, श्री काळाराम मंदिर, नाशिक
मंदिरांतील पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सध्या केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर भारतामध्ये देवस्थानाचे प्रश्न बिकट होत आहेत. मंदिरांचे अधिग्रहण करून त्यामध्ये अहिंदूंची नियुक्ती केली जात आहे. यांमुळे मंदिरांतील परंपरा नष्ट होत आहेत. मंदिरातील परंपरागत पूजाविधी पुन्हा चालू होणे आवश्यक आहे. मंदिरातील पैसा धर्मकार्याव्यतिरिक्त अन्यत्र वापरला जात आहे. या परिषदेच्या माध्यमातून मंदिरांतील धर्मपरंपरांच्या रक्षणार्थ मंदिर विश्वस्तांचे संघटन होईल, असे प्रतिपादन नाशिक येथील श्री काळाराम मंदिराचे आचार्य महामंडलेश्वर महंत श्री सुधीरदासजी महाराज यांनी केले.

काशी विश्वनाथ मंदिरासाठीचा लढा हा हिंदु संस्कृतीरक्षणाचा लढा ! – विष्णु शंकर जैन, अधिवक्ता, सर्वोच्च न्यायालय
हिंदूंवर आक्रमण करण्यासाठी सर्वप्रथम मंदिरांना लक्ष्य करण्यात आले. अयोध्या, मथुरा, काशी यांसह असंख्य ठिकाणी देवतांच्या मंदिरांची आणि मूर्तींची तोडफोड करून त्या ठिकाणी मशिदींची निर्मिती करण्यात आली. काशी विश्वेश्वराचे मंदिर 3 वेळा पाडण्यात आले. काशी विश्वेश्वराचे मंदिर मुक्त करावे, ही छत्रपती शिवाजी महाराज यांची शेवटची इच्छा होती. ती पूर्ण होण्याची वेळ आता दूर नाही. हिंदूंनी ही सर्व मंदिरे मुक्त करायला हवीत. काशी विश्वनाथ मंदिरासाठीचा लढा हा हिंदूंच्या संस्कृतीरक्षणाचा लढा आहे, असे प्रतिपादन अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी या वेळी केले.

सरकारी उद्योगांचे खाजगीकरण, तर मग हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण का ? – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
सनातन धर्माच्या विरोधात पूर्वीपासून चालू असलेल्या आघातांचे सत्र अद्यापही चालूच आहे. मंदिर केवळ देवालयच नाही, तर ते विद्यालय आहे, न्यायालय आहे, तसेच आरोग्यालयही आहे. पूर्वीच्या काळी मंदिरांद्वारे विश्वविद्यालये चालवली जात असत. त्यांतून हिंदूंना विद्या प्रदान केली जात होती. मोगल आक्रमकांनी मंदिरांचा विध्वंस करून तेथील धन लुटले, तर मंदिरे सधन असल्याने तेथील ज्ञानसंपदा चालूच राहील आणि मिशनर्‍यांच्या कॉन्वेंट शाळा चालणार नाहीत, हिंदूंना धर्मांतरीत करता येणार नाही, या उद्देशाने ब्रिटिशांनी मंदिरांतील धनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मंदिरांच्या सरकारीकरणाला प्रारंभ केला. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला; मात्र मंदिरे स्वतंत्र झालीच नाहीत.

सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात जाऊन आज ‘सेक्युलर’ सरकारने 4 लाख मंदिरे स्वतःच्या नियंत्रणाखाली घेतली आहेत. एकीकडे सरकारी उद्योगांचे खाजगीकरण केले जात आहे, तर मग हिंदू मंदिरांचे सरकारीकरण का, असा प्रश्न हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी उपस्थित केला. आज सरकारीकरण झालेल्या शिर्डी देवस्थान, श्री तुळजाभवानी देवस्थान, श्री महालक्ष्मी देवस्थान या आणि अशा विविध मंदिरांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे मंदिरांवर सरकारचे नियंत्रण येऊ नये, यासाठी प्रत्येक मंदिराच्या प्रतिनिधींनी प्रयत्न करायला हवेत, असेही श्री. शिंदे म्हणाले.

….श्री. सुनील घनवट, राज्य संघटक, महाराष्ट्र व छत्तीसगड, हिंदु जनजागृती समिती (संपर्क : 7020383264)

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!