
नांदेड/मुखेड| जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील मौजे दबडे शिरूर-मुखेड-लातूर राज्य महामार्गावरील मुखेडनजीक असलेल्या दबडे शिरूर पाटीजवळ बस व कंटेनरची समोरासमोर धडक झाली. एसटी चालक, वाहक यांच्यासह बसमधील दोन प्रवासी व इतर दोघे असे एकूण सहा प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना सायंकाळी ६ वाजता घडली असून, अपघात होताच कंटेनरचालक फरार झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मुखेड आगाराची बस एमएच २० बीएल २२२८ ही कामजळगा या गावावरून प्रवाशांना घेऊन मुखेडकडे येत होती. तर कंटेनर जी.जे.०५ बी.एक्स ७६४२ हा मुखेडकडून लातूरला जात होता. कंटेनर चालकाने दुसऱ्या वाहनास ओव्हरटेक करण्याच्या नादात मुखेडकडे येणाऱ्या एसटीला दबडे शिरूर पाटील येथे समोरासमोर धडक दिली आहे. ही धडक एवढी जोराची होती की एसटीचा समोरचा भाग चकाचूर झाला.

या घटनेत एसटी चालक रामदास कबीर वय ४० वर्ष, वाहक एम.एन.पांढरे व एसटीमधील प्रवासी रघुनाथ मस्कले वय ५० वर्ष, पुष्पाबाई बनसोडे वय ५३ वर्ष हे जखमी झाले. कंटेनर चालकाने या अपघाता आधी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या बालाजी गणपतराव हाके वय ३५ वर्ष या पादचाऱ्याला धडक दिली. यात हाके हे गंभीर जखमी झाले तसेच कंटेनरमध्ये बसलेले प्रवासी देवीदास राठोड वय ५५ वर्ष हेसुद्धा गंभीर जखमी झाले आहेत.

एसटी चालक रामदास कबीर यांचे दोन्ही पाय अडकल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी तब्बल अर्धा तास लागला. पुढील उपचारासाठी त्यांना नांदेडला हलवण्यात आले. शिरूर-मुखेड-लातूर राज्य मार्गावरील दबडे शिरूर पाटीजवळ बस व कंटेनरची समोरासमोर धडक झाल्यानंतर एस ती महामंडळ बसच्यासमोरील भाग चक्काचूर झाला.

