
नांदेड| जुन्या नांदेड शहरात भर दिवस गोळीबाराची घटना शुक्रवारी दि.३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेत एक युवक जखमी झाला असून, जखमी युवकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सराफा व्यापारी सचिन पंढरीनाथ कुलथे (३०) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, वैयक्तिक वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

गोळीबाराच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. गोळी मारणाऱ्या दोन जणांना इतवारा पोलिसांनी ताब्यात घेतले. नांदेडच्या जुना मोंढा भागातील शारदा टॉकीजकडे जाणाऱ्या गल्लीच्या रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी गोळीबाराचा आवाज झाला. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

सराफा व्यापाऱ्याच्या हातावर लागली गोळी संशयित आरोपी गजानन मामीडवार आणि त्याचा अल्पवयीन मुलगा यांनी दुचाकीवर येऊन ही फायरिंग केली असल्याचे सांगण्यात आले. यात व्यापारी सचिन कुलथे यांच्या हातावर गोळी लागली. विशेष म्हणजे दोन्ही आरोपींकडे गावठी पिस्तूल होते. सुदैवाने सचिन कुलथे याच्या दंडावर गोळी लागली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करण्यात आली.

