
हदगाव/तामसा गजानन जिदेवार। बामणी फाटा परिसरात उंचाडा येथून कयाधू नदीतील रेतीने भरून आलेले ट्रॅक्टर काल शुक्रवारी दुपारी पकडले. तसेच रात्री उशिरा तामसा भागात मुरूमाचे अवैध उत्खनन करून वाहतूक करणारे दोन टिप्पर पकडले. ही कारवाई उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार भगवान हंबर्डे व त्यांच्या पथकाने केली.

तालुक्यात अवैध रेती व मुरुमाचे अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू असून तहसील कार्यालयाचे अधिकारी, तलाठी व पोलीस अर्थपूर्ण दुर्लक्ष करतात असा आरोप केला जात आहे. खुद्द रेतीचोरच महसूल व पोलीस अधिकाऱ्यांचे या रेतीचोरीसाठी सहकार्य असल्याचा दावा करत आहेत. परंतु सामान्य नागरिक व गावोगावचे सामाजिक कार्यकर्ते मात्र महसूल विभाग आणि पोलिसाकडे वेळोवेळी तक्रारी करतच असतात. परंतु याची दखल कोणीही घेत नाहीत. यावरूनच रेती चोरांच्या वक्तव्याची सत्यता लक्षात येते.

उंचडा येथील कयाधू नदीतून मोठ्या प्रमाणात रेती चोरी केली जात आहे तेथून दररोज दहा ते बारा ट्रॅक्टरने रेतीचा अवैध ऊपसा केला जातो, अशी माहिती मिळताच उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील नायब तहसीलदार भगवान हंबर्डे यांच्या पथकाने बामणी फाटा परिसरात उंचाडा येथून भरून आलेले चिंचगव्हाण येथील घडबळे यांच्या मालकीचे ट्रॅक्टर पकडले. या ट्रॅक्टरच्या हेडवर किंवा ट्रॉलीवर कुठेही परिवहन विभागात नोंदणी केलेला नंबर नंबरप्लेट किंवा नंबर टाकलेला दिसून येत नाही.

याशिवाय एका खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की तामसा मंडळातील बारालिंग परिसरातील मुरुमाचे जेसीबी यंत्राच्या साह्याने उत्खनन करून काही टिप्परने वाहतूक केल्या जात आहे. या माहितीच्या आधारे उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या नायब तहसीलदार भगवानराव हंबर्डे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या गौण खनिज विरोधी पथकाने रात्री बारा वाजल्यानंतर जाऊन गौण खनिज उत्खनन करणाऱ्या वाहनांना तामसा येथे ताब्यात घेऊन हदगाव तहसील कार्यालयात आणले. या सहा ब्रास मुरुमाची वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकांचे जवाब नोंदवले आहेत.

विशेष म्हणजे या एमएच २६ बीई ८१८६ व एमएच २६ बीई ५०४६ असा परिवहन विभागाचा नोंदणी क्रमांक असलेल्या या दोन्ही टिपरच्या पाठीमागे नंबर प्लेट नाहीत किंवा नंबर टाकलेले नाहीत. तसेच ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर सुद्धा कोणत्याही बाजूने नंबर प्लेट किंवा नंबर टाकलेले नाहीत. ट्रॅक्टरहेडच्या सुद्धा कुठेही नंबर प्लेट आढळून आली नाही. ही बाब प्रशासनाने गंभीरतेने घेऊन पोलीसात गुन्हे दाखल करावेत अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या या गौण खनिज बचाव पथकात पथक प्रमुख नायब तहसीलदार बी.बी.हंबर्डे, व त्यांचे सहकारी तलाठी बी. एच. देवकते, व्ही. एस. वडकुते, जनार्दन मुंगल, इत्यादींचा समावेश होता. या पथकाच्या धाडसी कारवाईमुळे या पथकाचे कौतुक केले जात आहे.

आणि तहसील कार्यालयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले असून या भागातील पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांची या गौण खनिज चोरीला सहमती असायलाच पाहिजे असे नागरिकांत बोलले जात आहे. परंतु या मागचा कारण काही महसूलच्या अधिकाऱ्यांनी प्रतिनिधीला ऑफलाइन सांगितले कि अश्या चोरीच्या कामा मध्ये नेत्यांनी फोन करू नये किंवा त्यांची भूमिका दाखु नये तर आम्ही अश्या प्रकारच्या अनेक मोठ्या कारवाई करू शकतो.
