नांदेड/हिमायतनगर,अनिल मादसवार| ईश्वर अल्ला एकचं असून, मानवी जीवन सफल करण्यासाठी सर्व धार्मिय नागरिकांनी संतांच्या सानिध्यात राहून देवाचे नामस्मरण करावे. आई वडिलांची सेवा करून पुण्य प्राप्त केल्यास मानव जन्माचे सार्थक होते. असा संदेश दत्त संस्थान पिंपळगाव येथील बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांनी दिला. ते दाटाळी पौर्णिमेला आयोजित महाप्रसाद कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या भाविकांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
नांदेड जिल्ह्यातील हदगाव- भोकर तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या जंगलाच्या कुशीत वसलेल्या श्री दत्त संस्थांन पिंपळगावच्या वतीने दि.०५ फेब्रुवारी रोजी दाटाळी पौर्णिमेच्या निमित्ताने भव्य महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नांदेड जिल्ह्यातील, हदगाव, हिमायतनगर, भोकर, उमरी, किनवट आदींसह बहुतांश तालुक्यातील भाविकांनी उपस्थित होऊन दत्तात्रेयांच दर्शन घेऊन बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी उपस्थित झालेल्या भाविकांना बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी मार्गदर्शन सांगितले कि, मानवाच्या जीवनाला कधी कोणत्या ठिकाणी कलाटणी मिळेल हे सांगता येत नाही.
मानवी जीवन एका मोबाईलच्या रेंजप्रमाणे आहे. असे सांगून त्यांनी आपल्या जीवनाला संतांच्या सानिध्यात राहून कशी कलाटणी मिळाली याचा प्रत्यक्ष अनुभव कथन केला. जीवात्मा जन्माला आल्यावर भगवंताचे नामस्मरण करणे हे आपलं कर्तव्य आहे, संतांची सेवा केल्याशिवाय जीवनाची यात्रा संपन्न होत नाही असा संदेशही यावेळी स्वामींनी उपस्थितांना दिला. पिंपळगाव हे छोटंसं गाव डोंगराच्या कुशीत वसलेले आहे, हे संस्थान तेलंगणा, मराठवाडा, कर्नाटक व विदर्भातील सर्वाना परिचित आहे.
तुम्ही सर्व पुण्यत्मा आहात… मानव जीवन प्राप्त करून ग्रस्थाश्रमात जगता आहात.. मानव जीवन जगताना भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे. आणि संतांच्या गुरूंच्या सानिध्यात सेवा केली पाहिजे. पिंपळगाव हे देवस्थान कुणाला माहित आहे… कुणाला माहित नाही, दर पौर्णिमेला येथे पालखी निघते प्रदक्षिणा होऊन महाआरती व महाप्रसाद होत असतो. दाटाळी पौर्णिमा हि उत्साहात साजरी केली जाते, माहूरला खूप दिंड्या निघतात. त्याचं पद्धतीचा एक छोटासा कार्यक्रम म्हणून पिंपळगाव येथे महाप्रसाद कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमास आपण सर्वानी उपस्थित लावली याबद्दल महाराजांनी सर्वांचा स्वागत करून आशीर्वाद दिले.
यावेळी उपस्थित सर्व भाविक भक्तानी बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्या बरोबर देवा दत्ता दत्ताचं नामस्मरण केलं. याप्रसंगी आ.माधवराव पाटील जवळगावकर, माजी आ.नागेश पाटील आष्टीकर, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबूराव कदम कोहळीकर, रामदास पाटील सुमठाणकर, आदींसह नांदेड जिल्ह्यातील अनेक राजकीय नेते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, वैद्यकीय व्यावसायिक, सर्व क्षेत्रातील भाविक भक्तांनी उपस्थित होऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.