
हदगाव, शे.चांदपाशा| शासनाने प्लास्टिक बंदी केली आहे. शहरासह संपूर्ण तालुक्यात सर्रासपणे मोठया प्रमाणात प्लास्टिकचा वापर होत असुन, या बाबतीत गेल्या अनेक महीण्यापासुन कारवाई होत नसल्याने व्यावसायिकांचे चांगलेच फावत आहे. शासनाच्या प्लास्टिक बंदीच्या आदेशाचा हदगाव शहरासह तालुक्यात बोजवारा उडाला आहे.

शासनने प्लास्टिक बंदीची घोषणा केली. ५० मायक्रोन प्लॅस्टिक बॅग्जला काही अटींवर मुक्त परवानगी दिली. मात्र, या परवानगीचा चुकीचा अर्थ लावत विक्रेत्यांनी बंदी असलेल्या प्लास्टिकची खुलेआम वापर सुरू केला आहे. मध्यंतरी नगर परिषदेने प्लास्टिक बंदीची मोहीम राबवून दंड वसूल केला होता. त्यावेळी प्लास्टिक वापर करणाऱ्यांचे धाबे दणाणले होते. काही काळ प्लास्टिक बंदी झाली होती. मात्र, त्यानंतर मोहीम थंडबस्त्यात गेल्याने प्लास्टिक बंदीच्या नियमांना बगल दिली जात आहे.

दखलच नाही … वापरात नसलेले प्लास्टिक सार्वजनिक नाल्यांत. उघड्यावर कचरा घंटा गाडीत किवा ट्रक्टर मध्ये टाकून दिले जाते. वारा आला की, हे प्लास्टिक हवेसोबतच रस्त्यावर उडते. कचरा वाहणाऱ्या गाड्यावर ताडापञी वापरत नाहीत प्लास्टिक पिशव्यांमुळे नाल्या, गटारे जाम होत असल्याची वस्तुस्थिती आहे. प्लास्टिक पिशवी शिवाय खर्रा बनवून ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पन्नीचा वापर होत आहे. खर्रा घासल्यावर ही प्लास्टिक पन्नी रस्त्यावर कुठेही फेकली जात आहे. त्यामुळे बाजारात, सार्वजनिक ठिकाणी सर्वत्र प्लास्टिक पन्नीचा खच पडल्याचे दिसून येते आहे.

प्लास्टिक पिशव्यांतून सर्रास वस्तू दिल्या जात आहेत. नगरपरिषद क्षेत्रात तर मोठ्याप्रमाणात प्लास्टिकयुक्त कचरा संकलित होत असल्यावरून या बाबतीत न..पा. प्रशासनाकडुन ठोस अशी कारवाई होतांना दिसुन येत नाही. शहरात प्लास्टिक वापराची कल्पना येते. आजघडीला भाज्या, फळांसाठी सर्रास प्लास्टिकचा वापर होऊ लागला आहे. तर इतर किराणा साहित्यांसह ग्रामीण भागात चहा टपरीवर चहा देखील प्लास्टिकच्या पिशवीत पार्सल म्हणून देत असल्याचे दिसून येत आहे. असे असताना याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने शासनाच्या आदेशाचा हादगावमध्ये बोजवारा उडाला असल्याचे पाहावयास मिळते आहे.

मुख्याधिका-याशी संपर्क होत नाही….
हदगाव नगरपरिषदेत सध्या प्रशासकीय राज असुन, प्रभारी मुख्यधिकारी म्हणुन हदगाव तहसिल कार्यालयाचे नायब तहसिलदार हे आहेत. प्रशासक म्हणून तालुक्याचे तहसिलदार आहेत त्यांच्याकडे सध्याचा कामाचा व्याप पाहुन न.पा.कडे त्यांना लक्ष दयायला वेळच मिळत नाही. या बाबतीत त्यांच्याशी संपर्क साधला असता माञ त्यांच्याशी माञ संपर्क होऊ शकलेला नाही हे आवर्जून उल्लेख करावा लागेल.
