
पुणे| ‘सोसायटी ऑफ हिटिंग ,रेफ्रिजरेटिंग अँड एयर कंडिशनिंग इंजिनियर्स ‘च्या वतीने ज्येष्ठ आर्किटेक्ट,व्ही.के.आर्किटेक्चर चे संस्थापक विश्वास कुलकर्णी यांचा आर्किटेक्ट क्षेत्रातील ५० वर्षांच्या योगदानाबद्दल ‘स्पेस अवॉर्ड’ देऊन सत्कार करण्यात आला. ‘सस्टेनेबिलिटी इन हाय राईझ’ विषयावर झालेल्या ग्रीन कॉन्क्लेव्ह मध्ये ज्येष्ठ आर्किटेक्ट ख्रिस्तोफर बेनिंजर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. सुझलॉन वन अर्थ(केशवनगर,हडपसर) येथे हा कार्यक्रम शनिवारी पार पडला.

‘सोसायटी ऑफ हिटिंग ,रेफ्रिजरेटिंग अँड एयर कंडिशनिंग इंजिनियर्स ‘च्या पुणे चॅप्टर चे अध्यक्ष वीरेंद्र बोराडे,कॉन्क्लेव्ह च्या निमंत्रक अंशुल गुजराथी, आनंद चोरडिया,सुभाष देशपांडे,पंकज धारकर, एन.एस चंद्रशेखर,प्रदीप भार्गव ,चेतन सोळंकी,शीतल भिलकर हे सन्मानार्थी उपस्थित होते.

सुवर्णमहोत्त्सवी योगदानाबद्दल सत्कार
विश्वास कुलकर्णी यांनी प्रसिद्ध वास्तूविशारद चार्ल्स कोरिआ यांच्यासमवेत कामाला सुरुवात केली.कुलकर्णी यांनी स्थापन केलेल्या व्ही के आर्किटेक्चर या कंपनीने सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे.शहर नियोजन,पर्यावरण,ग्रीन बिल्डींग्स,इंटेरिअर डिझाईन,अशा क्षेत्रात त्यांनी योगदान दिले आहे.

पुण्याचे श्रद्धास्थान असलेले दगडूशेठ गणपती मंदिर,जिल्हा परिषद नवीन प्रशासकीय इमारत, परमार ट्रेड सेंटर अशा १ हजार इमारतींची वास्तुरचना आरेखन व्ही के आर्किटेक्चरने केले आहे. ग्रीन होम्स प्लॅटिनम प्रमाणपत्र मिळविणारे ते राज्यातील पहिले वास्तुविशारद आहेत.ग्लोबल रिअल इस्टेट काँग्रेस चा ‘टॉपमोस्ट आर्किटेक्ट’ पुरस्कार त्यांना मिळाला आहे

‘आर्किटेक्ट महाविद्यालये आणि आर्किटेक्ट कंपन्या यांनी स्मार्ट,शाश्वत शहर बनविण्याच्या दिशेने एकत्र काम करावे. आम्ही त्यासाठी मेंटॉरशिप प्रोग्रॅम तयार केला आहे.नीतिमान आर्किटेक्ट तयार करणे हे उद्दिष्ट त्यातून साध्य करता येईल’,असे मनोगत विश्वास कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

