
अर्धापूर, निळकंठ मदने| सलग कडाक्याची थंडी पडत असल्याने तालुक्यात थंडीची लाट पसरली असून, थंडीचा वातावरणामुळे रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकांना होत असल्याने शेतकरी आनंदी दिसत आहेत.

रब्बी हंगामातील पिकांना थंडीचे वातावरण पोषक असते मात्र रब्बी हंगामातील पिकांच्या सुरुवातीला ढगाळ वातावरणामुळे पिकांची वाढ खुंटली होती, परंतु मागील काही दिवसापासून अर्धापुर तालुक्यात थंडीची लाट उसळली असल्याने पिके जोमात असल्याचे चित्र दिसत आहे.

अर्धापुर तालुका इसापूर धरणाच्या लाभ क्षेत्रात येत असल्याने मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामाची पेरणी करण्यात आली आहे. यंदा सर्वाधिक हरभरा पिकाची पेरणी करण्यात आली आहे. रब्बी हंगामाच्या सुरुवातीपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पिकांवर अनेक रोगराईने ग्रासले होते. यामुळे पिकांच्या वाढत परिणाम झाला होता, परंतु मागील काही दिवसापासून थंडीत वाढ झाल्याने पिके जोमात दिसत आहेत.

खरीप हंगामाने दिला धोका …!
खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग व तूर पिकांना परतीच्या पावसाचा फटका बसला होता. हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला होता. खरीप हंगामावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच बिघडले होते.
थंडीने पिके टवटवीत…!
यातून सावरून रब्बी हंगामाची तयारी सुरू केली मात्र सुरुवातीपासून ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांची वाढ खुंटली होती. सतत ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पिकांवर फवारणी खर्च वाढला होता. हरभरा पिकाला मर रोगाची लक्षणे वाढली होती. अळीचा प्रादुर्भाव वाढलं होत. यामुळे हरभरा पिकावर दोन ते तीन फवारण्या कराव्या लागल्या होत्या मात्र आता हरभरा पिकासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने पिके टवटवीत दिसत आहेत.

