
नांदेड| बेकायदेशिररित्या कामावरुन कमी केलेल्या कामगारांना कामावर घ्यावे या व इतर मागण्यांसाठी आयटक प्रणित शासकीय औद्योगीक कामगार संघटनेच्यावतीने सामाजिक वनीकरणच्या विभागीय कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुद्दत आंदोलन सुरु करण्यात आले आहे. आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. अधिकार्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

औद्योगिक न्यायालयाचे कामावरुन कमी न करण्याचे आदेश असतांनाही मुखेडमध्ये अनेक कामगारांना बेकायदेशिररित्या कामावरुन कमी केलेले आहे. त्याचप्रमाणे तोंडी हुकूमाने बेकायदेशिर रित्या कामावरुन कमी केलेल्या कामगारांना तात्काळ कामावर घ्यावे, नियत वयोमानाचे कारण देवून कमी केलेल्या कामगारांना ग्रॅच्युटी मिळवून द्यावी, मुखेड येथील कामगारांना औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार तात्काळ कामावर घ्यावे.

मुखेड येथे बेकायदेशिर कामगार प्रथेचा अवलंब करुन 30-35 वर्षांपासून काम करणार्या कामगारांना सोसायटी अथवा नगदी स्वरुपात अत्यल्प वेतन देवून कामगार कायदा व किमान वेतन कायद्याची होणारी पायमल्ली थांबवावी, भोकर, देगलूर, कंधार, हदगाव, उमरी, धर्माबाद येथील कामगारांचा तीन महिन्यांचा थकीत पगार तत्काळ अदा करावा या व इतर मागण्यांसाठी संघटनेच्यावतीने वारंवार पत्रव्यवहार, आंदोलन करुनही अधिकार्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने आगामी काळात हे आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी बोलतांना कामगार नेते ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर यांनी दिला आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व कॉ.अब्दुल गफार, कॉ.शिवाजी फुलवळे हे करीत आहेत. तर कॉ.पिराजी घाटे, कॉ.तुकाराम भद्रे, कॉ.बालाजी औरादे, कॉ.भीमराव राठोड, कॉ.गंगाबाई हाते यांच्यासह अनेक कामगार या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

