
नांदेड| जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर बदलत्या शैक्षणिक पद्धतींचा विचार करून निवडलेल्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करावे असे आवाहन नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले. ते हुतात्मा राजगुरू महाविद्यालय व साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण व गुणगौरव समारंभाप्रसंगी बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ड.देवेंद्र बुट्टेपाटील होते. या प्रसंगी महाराष्ट्र केसरी विजेते पैलवान शिवराज राक्षे, संस्था उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, ड. राजमाला बुट्टेपाटील, संचालक शांताराम घुमटकर, बाळासाहेब सांडभोर, हिरामण सातकर, राजाराम लोखंडे, प्राचार्य डॉ. एस. एस. पिंगळे, प्राचार्य डॉ. एच. एम. जरे, उपप्राचार्य प्रा. व्ही. बी. दौंडकर, प्रबंधक कैलास पाचारणे उपस्थित होते.

पै.शिवराज राक्षे यांचा खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने मानाची गदा व १ लाख १ हजार १११ रूपये देण्यात येऊन नागरी सत्कार करण्यात आला. खेड तालुका जी.पुणे खरेदी विक्री संघाच्या वतीनेही पै. शिवराज राक्षे यांना १ लाख रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षणात गुणवत्तापूर्ण बदल होणार असून विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून वाटचाल करावी, असे सांगितले.

स्पर्धेच्या युगात खडतर परिश्रमाशिवाय यश नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी उद्याच्या आव्हानांना आत्मविश्र्वाने सामोरे जाताना समाजाच्या विविध क्षेत्रात स्वतः चे अस्तित्व निर्माण करावे असे आवाहन त्यांनी केले. महाविद्यालयातील विविध उपक्रमांचे व गुणवंत विद्यार्थ्याचे कौतुक करून त्यांनी संस्था विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल आनंद व्यक्त केला. महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे म्हणाले की, मेहनत व शिस्तीने केलेल्या सरावाने मला यशमिळाले असून विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी मेहनतीची कठोर तपश्चर्या करावी असे आवाहन केले.

खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते क्रीडा विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, सांस्कृतिक विभाग तसेच विविध शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. केंद्रीय व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षा उत्तीर्ण झालेले महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मिलिंद गाढवे, सागर पिंगळे, शुभम मांजरे, धनंजय सातकर, ऋषिकेश बो-हाडे यांचा संस्थेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. अहवाल वाचन प्राचार्य डॉ. एस. एस. पिंगळे, प्राचार्य डॉ. एच. एम. जरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संजय शिंदे यांनी पारितोषिक वाचन प्रा. प्रतिमा लोणारी, प्रा. सारिका गोरे, प्रा. योगेश मोहिते यांनी परिचय डॉ. योगेश वाकुंज यांनी तर आभार उपप्राचार्य प्रा.व्ही.बी. दौंडकर यांनी मानले.

