नांदेड| दैनिक वृत्तरत्न सम्राटच्या माध्यमातून फुले, शाहु, आंबेडकरी चळवळीला तथा धम्म चळवळीला गतिमान करून गेल्या वीस वर्षांपासून अनेक शोषित, वंचित समूहातील घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम करणारे बबन कांबळे हे आंबेडकरी वृत्तपत्र चळवळीतील एक अनभिषिक्त सम्राट होते, अशा शोक संवेदना येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी व्यक्त केल्या. लहान येथील बौद्ध धम्म परिषदेत भिक्खू संघाच्या वतीने कालवश बबन कांबळे यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.
भदंत पंय्याबोधी थेरो यासंदर्भात बोलताना पुढे म्हणाले की, बबन कांबळे यांनी राज्यात अनेक पत्रकार, लेखक, कवी यांना आपल्या सम्राट या वृत्तपत्राच्या माध्यमातून लिहण्याची संधी दिली. राज्यातील गावागावात – शहराशहरात होणाऱ्या अन्याय – अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम केले. दैनिक वृत्तरत्न सम्राटचा अग्रलेख वाचनीय असायचे. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी बबन कांबळे यांचे दुःखद निधन झाल्याने समाजातील सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत होती. दैनिक सम्राट वाचकांचा जनसागर शोकसागरात बुडाला आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीतही त्यांचा सिंहांचा वाटा होता. प्रशिक्षण केंद्रातही कांबळे यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
अत्यंत यातनादायी घटना – डॉ. यशवंत मनोहर
दैनिक वृत्तरत्न सम्राटच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळ घराघरात पोहचविणारे दैनिक वृत्तरत्न सम्राटचे संपादक, मालक, मुद्रक, प्रकाशक बबन कांबळे यांचे दुर्धर आजाराने निधन झाले. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, सडेतोड पत्रकार, विद्वान संपादक, बहुजन चळवळीचा मार्गदर्शक हरपला अशी भावना व्यक्त होत असतांना जवळा देशमुख येथील दुसऱ्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनात कार्यवाह प्रज्ञाधर ढवळे यांच्या निवेदनावरुन बबन कांबळे यांना मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान, सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी बबन कांबळे यांच्या निधनाची घटना अत्यंत अनपेक्षित, आकस्मिक आणि यातनादायी असल्याचे म्हटले आहे.