
हिमायतनगर, परमेश्वर काळे। सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या हिमायतनगर येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिराची महाशिवरात्रीला भव्य यात्रा भरते. मात्र हिमायतनगर शहरातील बंद असलेले पथदिवे यामुळे यात्रा काळात व्यत्यय निर्माण होणार आहे. ही बाब लक्षात घेता तात्काळ शहरांतील सर्व पथदिवे चालू करून भाविक भक्तांची व यात्रेकरूंची होणारी अडचण सोडवावी. अशी मागणी हिमायतनगर वाढोणा येथील श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नागेश लोणे यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे.

मागील दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर यंदा पहिल्यांदाच महाशिवरात्रीनिमित्त हिमायतनगर वाढोणा शहराची यात्रा धुमधडाक्यात होणार आहे. कोरोनाचे सर्व नियम शिथिल करण्यात आल्याने यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची मंदीयाळी होणार आहे. सबंध विदर्भ – मराठवाडा- तेलंगणा – आंध्रप्रदेश – कर्नाटक राज्यात प्रसिद्ध असलेली हिमायतनगर (वाढोण्याच्या) श्री परमेश्वराची महाशिवरात्री यात्रा उत्सव जवळ येऊन ठेपला आहे. महाशिवरात्री यात्रेला गुरुवार दि.१६ फेब्रुवारी पासून सुरु होऊन दि.०३ मार्चला समारोप केला जाणार आहे. यात्रा महोत्सव दरम्यान भाविक – भक्त, व्यापारी, कलावंत, खेळाडू, भजनी मंडळ व यात्रेकरूना येणाऱ्या आडी- अडचणी व नियोजन यावर सखोल चर्चा झाली. तसेच यात्रेच्या सात दिवस ज्ञानेश्वरी व वीणा पारायण सप्ताह, काकडा आरती, हरिपाठ, अखंड हरिनाम, किर्तन, प्रवचने आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत. नंतरच्या काळात धार्मिक – सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा व शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रम आणि खास करून शंकर पाटाचे आयोजनही करण्यात आले आहे.

मागील महिन्यापासून हिमायतनगर शहरातील सर्वच पथदिवे बंद असल्याने शहरातील नागरिक भाविक भक्तांना विशेषतः अबाल वृद्धांना रात्रीला अंधाराचा सामना करावा लागत आहे. याबाबत माहिती घेतली असता नगरपंचायत प्रशासनाकडे महावितरण कंपनीची जवळपास २ कोटी रुपयाचे देयके थकीत आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यावरील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. आता महाशिवरात्री यात्रा होणार असल्याने यात्रेचे प्रसिद्धी पत्रक घेऊन मंदिर कमिटीचे सेक्रेटरी अनंतराव देवकाते, संचालक संजय माने, विलास वानखेडे आदींसह अनेकजण गेले होते. यात्रेचे औचित्य लक्षात घेता तात्काळ वीजपुरवठा सुरु करून यात्रा काळात भाविक भक्तांची कोणतीही अडचण होणार नाही यासाठी मंदिर कमिटीच्या वतीने अभियंत्याने विनंती करण्यात आली आहे.

आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी केल्या वीज पुरवठा सुरु करण्याच्या सूचना

महाशिवरात्री यात्रा उत्सवाची दखल घेता हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी देखील नांदेडचे कार्यकारी अभियंता यांच्याशी दूरधवनीवरून संपर्क करून हिमायतनगर शहरातील खंडित करण्यात आलेला वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या आहेत. आतातरी शहरातील रस्त्यावरील खंडित झालेला विपुरवठा सुरळीत होऊन भाविक भक्तांची अडचण दूर होईल अशी अपेक्षा सर्वाना आहे.

