
कोणत्याही चळवळीला आपल्या विचारांची पेरणी करण्यासाठी आवश्यक असणारे सर्वोत्तम साधन म्हणजे वर्तमान पत्र आहे. ज्या समाजाकडे हे साधन नाही त्या समाजाची स्थिती पंख तुटलेल्या पक्षा समान असते हया डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्याला प्रमाण मानून दै. सम्राट च्या रुपाने अवतरलेल्या मा. बबन कांबळे सरांनी व्यावसायिकतेच्या दुनियेला लाथाडून समाजाच्या मनातील आक्रोशाला अभिव्यक्त करण्याचा छंद जोपासला.

अनेक नव्या अभ्यासकांना आपल्या पेपरातुन लिहण्याची व्यवस्थे विरुद्ध आग पाखडण्याची संधी दिली.व्यवस्था परिवर्तनासाठी झपाटलेल्या आंबेडकरी रक्ताला आस्मानी उर्जा दिली. मी प्राध्यापक म्हणून सेवा करताना सामाजिक बांधिलकी म्हणून आंबेडकरी समाजाला जागृत करण्यासाठी लेखणी हातात घेतली होती. व्यवस्थे बरोबरच हिंदू धर्मरुढीच्या परंपरेत रुतून बसलेल्या आपल्या समाजाबद्दल माझ्या मनात चीड उत्पन्न झाली होती परंतु ती अभिव्यक्त कूठे करावी हेच कळत नव्हत. त्यावेळी मा. बबन कांबळे साहेबांच दै. सम्राट हे आंबेडकरी समाजाचा बुलंद आवाज म्हणून माझ्या कानावर आदळल आणि मी झपाटून लिहायला लागलो. माझ्या फोटोसह शेकडो लेख मी दै. सम्राट मधून लिहिले आहेत.

त्यामुळे आंबेडकरी समाजातील नव्या पिढीचे लेखक विचारवंत आंबेडकरी वक्ता म्हणून माझी विशेष ओळख उभ्या महाराष्ट्राला निर्माण झाली. मी कामानिमित्ताने रेल्वे बस किंवा बसमधून प्रवास करताना सम्राट मधील माझ्या भाषणातील एखादी स्टेटमेंट किंवा फोटोंसह लेख वाचलेला हमखास कोणतरी एक बांधव जवळ येऊन जयभीम घालायचा आणि म्हणायचा सर मी सम्राट मधील आपला अमुक अमुक लेख वाचला आहे. हे ऐकल्यावर मी आंबेडकरी समाजातील विशेष ओळख असलेला माणूस असल्याचा भास होऊन माझी छाती जेवढी फुगायची त्याहून मोठा अभिमान सम्राटचा वाटायचा हा पेपर महाविद्यालयातील वाचनालयात लावण्यासाठी मा. प्राचार्यांशी मी भांडल्याचे मला आज आठवत आहे.

अशीच एक मा. बबन कांबळे साहेबांनी माझ्याशी फोनवरुन केलेल्या रोखठोक संवादाची आहे. मी बिलोली येथे २६ नोव्हेंबर २०१२ मध्ये संविधान दिनावर व्याख्यान देताना महात्मा गांधी हे राष्ट्र पिता नसून राष्ट्र द्रोहीकसे आहेत हे संदर्भासह सांगितल होत.त्यावेळचे तेथील सम्राटचे पत्रकार मा.राजेंद्र कांबळे यांनी याच स्टेटमेंट सह दै.सम्राटला बातमी दिली होती. त्यावेळी ही बातमी लावताना मा. बबन कांबळे साहेबांनी मला फोन करुन सांगितल होत ‘ सर ही बातमी वादळ निर्माण करणारी होऊ शकते आपण संदर्भ तयार ठेवा बाकी सम्राटचा आंबेडकरी बाणा आहेच तुमच्या पाठीशी, आहे म्हणून बातमी छापली होती. अशा या आंबेडकरी बाण्याने आपल्या सम्राट मधून असंख्य आंबेडकरी बाण्याची माणसे समाजाला समर्पित करुन आज मानवी जगाचा निरोप घेतला आहे. ते शांत झाले त्यांचा शांत होण्याने आंबेडकरी समाजाचा विद्रोही आवाज देखील शांत होण्याची साधार भीती आता वाटत आहे. अशा या आंबेडकरी समाजाच्या बंडखोर संपादक स्वाभिमानी बाण्याला भावपूर्ण श्रद्धांजली..

…..डॉ.सुनिलचंद्र सोनकांबळे धर्माबाद

