
पुणे| ‘भारतासह जगभर कॉर्पोरेट जगताच्या हितासाठी फॅसिझम बोकाळला आहे,लोकशाही व्यवस्था नष्ट करण्याचे काम चालू आहे. भावनात्मक मारा,राष्ट्रवादाची ठेकेदारी ,सैन्याचे उदात्तीकरण, ऐतिहासिक सत्याचे विकृतीकरण आणि सतत कोणता तरी शत्रूची भीती दाखवून द्वेष निर्माण करणे, ही फॅसिझमची लक्षणे असून ती सहज ओळखू येतात. फॅसिझम(हुकूमशाही) नको असेल तर महाकाय कॉर्पोरेट कंपन्यांच्या वस्तू,सेवा घेणे कमी करून त्यांची पैशाची ताकद कमी करणे हा एकमेव उपाय आहे,’ असे प्रतिपादन अमेरिकेतील गांधीवादी अभ्यासक डॉ.मायकेल सनलाईटनर यांनी केले.

अमेरिकेतील ‘पोर्टलॅंड कम्युनिटी कॉलेज चे विश्वस्त, ‘गांधी अँड किंग :सोल फोर्स अँड सोशल चेंज’ या पुस्तकाचे लेखक आणि गांधीवादी अभ्यासक डॉ.मायकेल सनलाईटनर यांच्याशी संवादाचा कार्यक्रम महाराष्ट्र गांधी स्मारक निधी (कोथरूड) येथे गुरुवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी डॉ.मायकेल सनलाईटनर बोलत होते. डॉ. कुमार सप्तर्षी यांनी डॉ.मायकेल यांचा शाल, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.डॉ.मायकेल यांनी गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी भारतीय समाज विकास व संशोधन संस्थेचे विश्वस्त डॉ. प्रवीण सप्तर्षी, लेखिका डॉ. अंजली सोमण, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव संदीप बर्वे, प्रा. नीलम पंडित, प्रकाश बुरटे, भारत जोडो यात्री प्रकाश ढोबळे उपस्थित होते.

डॉ.मायकेल सनलाईटनर म्हणाले,’लोकशाही तत्व आणि गांधी तत्व मारून टाकण्याचे काम भारतात सुरु आहे.त्यामुळे माझ्यासारखे अनेक जण अस्वस्थ आहेत.लष्करी प्रकारची हुकूमशाही,लोकशाहीच्या आवरणातील हुकूमशाही आणि कॉर्पोरेट हुकूमशाही असे हुकूमशाहीची प्रकार जगभर दिसतात.भारतात लोकशाहीच्या आवरणात हुकूमशाही येताना दिसत आहे. त्यासाठी राष्ट्रवादाचा मुखवटा घेतला जातो.जे राष्ट्रीय विचारांचे नाहीत,तेच त्याची प्रमाणपत्रे इतरांना मागत सुटतात.मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना अनुकूल अर्थव्यवस्था तयार केली जाते. त्यांच्यासाठी विकासाचे मोठ मोठे प्रकल्प उभारले जातात. त्यालाच विकास म्हणावे अशी त्यांची अपेक्षा असते. त्यात समाजाचे हित पाहिले जात नाही’.

देव,देश,धर्म ,जात अशा मुद्द्यांवर सतत भावनात्मक मारा केला जातो. राष्ट्रवादाची ठेकेदारी केली जाते.सैन्याचे सतत उदात्तीकरण केले जाते. संरक्षण साहित्यावर अफाट खर्च केला जातो. ऐतिहासिक सत्याचे विकृतीकरण करून सत्य मारून टाकले जाते. सतत कोणत्या तरी शत्रूची भीती दाखवून द्वेष निर्माण करणे,मॉब लिंचिंग सारख्या गोष्टी घडवून आणणे अशा गोष्टी होतात. ही फॅसिझमची लक्षणे असून ती सहज ओळखू येतात. फॅसिझम ( हुकूमशाही ) नको असेल तर महाकाय कॉर्पोरेट कंपन्यांच्या वस्तू , सेवा घेणे कमी करून त्यांची पैशाची ताकद कमी करणे हा एकमेव उपाय आहे. मी वैयक्तिक पातळीवर त्यासाठी प्रयत्न करीत आहे. एकूण लोकसंख्येच्या २० टक्के लोकसंख्या जरी निर्भीड झाली तरी हुकूमशाहीचा धोका टाळता येतो,असेही डॉ मायकेल यांनी सांगितले.

डॉ.मायकेल सनलाईटनर :गांधी विचाराचे अभ्यासक,लेखक
अमेरिकेतील ‘पोर्टलॅंड कम्युनिटी कॉलेज चे विश्वस्त, ‘गांधी अँड किंग :सोल फोर्स अँड सोशल चेंज’ या पुस्तकाचे लेखक आणि गांधीवादी अभ्यासक डॉ.मायकेल सनलाईटनर हे सत्तरच्या दशकापासून भारतात येत आहेत. गांधीजींचे सचिव प्यारेलाल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपला प्रबंध पुर्ण केला. विनोबा भावे, खान अब्दूल गफारखान, मोरारजी देसाई, जयप्रकाश नारायण, प्यारेलाल नायर, नारायणभाई देसाई या गांधीवादी नेत्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या आहेत. गांधीविचारांचा आजचा संदर्भ, स्वदेशी, स्वराज, मोक्ष, अहिंसा आणि सत्याग्रह, लोकशाही, विनोबा भावे, अमेरिकन राजकारण, दहशतवाद या आणि इतर सामाजिक – राजकीय विषयांवर त्यांची व्याख्याने होत असतात. २०२० साली दांडी यात्रेच्या अमृतमहोत्सवी यात्रेत प्रा. सनलाईटनर यांनी सहभाग घेतला होता.

