
उमरखेड/हिमायतनगर| विदर्भ – मराठवाडा सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा पात्रातुन रेती उपसा करून चोरट्या मार्गाने रेतीची वाहतुक करतांना उमरखेड येथील उपविभागिय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने मराठवाड्यातील दोन ट्रॅक्टर पकडून 13 लाखांचा मुद्देमाल जप्त करुन दोघां विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्या घटनांना आवर घालण्यासाठी तात्काळ रेती घटनेचे लिलाव करण्यात यावा अशी मागणी घरकुलासाठी रेती उपलब्ध होत नसलेल्या लाभार्थ्याकडून केली जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, उमरखेड – हिमायतनगर तालुक्याच्या मध्यभागातून वाहणारी पैनगंगा नदीपात्रातून हिमायतनगर तालुक्यातील घारापुर, विरसनी, पळसपूर, कामारी परिसरातून रात्री अपरात्री रेतीची चोरट्या पद्धतीने वाहतूक केली जात आहे. याबाबत हिमायतनगर व उमरखेड तहसील प्रशासनाने बैठे पथक स्थापन केले आहेत. तरीदेखील रेतीचा उपसा करून वाहतूक करत गरजूना अव्वाच्या सव्वा दराने विक्री केली जात आहे. याबाबतची गुप्त माहिती मिळाल्यानंतर उमरखेड येथील उपविभागिय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने मराठवाड्यातील दोन ट्रॅक्टर पकडले आहेत.

या प्रकरणी ट्रॅक्टर MH 26 Bx 5636 व MH 26 Bx 9164 या वाहनातून पैनगंगा पात्रातील रेतीचा उपसा करून वाहतुक करतांना बोरी ( चातारी ) जवळील रस्त्यावर ट्रॅक्टर चालक राहुल काळबा हट्टेकर व सतिश दादाराव शिंदे दोन्ही रा. घारापुर ता. हिमायतनगर जि. नांदेड यांना दि. 6 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 वाजताचे दरम्यान उपविभागिय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने रेतीसह वाहन जप्त करून 13 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून उमरखेड पोलिस स्टेशनला दोघा ट्रॅक्टर चालकांविरुद्ध भादंवि 379 ( 3 4 ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हि कार्यवाही उपविभागिय पोलिस अधिकारी प्रदिप पाडवी यांच्या मार्गदशनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश खेडेकर, रुपेश चव्हाण, युनुस भावनासे यांनी पार पाडली. पैनगंगा नदीवरील रेती घाटांचा लिलाव न झाल्यामुळे उमरखेड आणि हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीपात्रातून रेतीचा उपसा करण्यासाठी उमरखेड – हिमायतनगर तालुक्यातील रेती माफियांसह मराठवाड्यातील रेती तस्करांचा शिरकाव झाल्याने लिलावापूर्वीच पैनगंगा पात्रातील रेती साफ करण्याचा चंग यांनी बांधला आहे. रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे काम उमरखेड पोलिस करीत आहेत. त्याचा धर्तीवर हिमायतनगर पोलीस व महसूल प्रश्नाने देखील करावी आणि शासनाचा बुडणार महसूल वाचवावा. तसेच घरकुल धारकांना अल्प दरात रेती उपलब्ध करून देण्यासाठी तात्काळ रेती घाटांचे लिलाव करून घरकुल धारकांची समस्या सोडवावी अशी मागणीही केली जात आहे.

