
नांदेड। पंजाब येथून सरदार कुलदीपसिंघ यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सचखंड श्री हुजूर साहब जथ्था कमिटी लुधियाना च्या २१५ सदस्यांनी नांदेड परिसरातील सर्व गुरुद्वाऱ्यांची परिक्रमा पूर्ण केल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी जात असतांना धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्यातर्फे सर्वांच्या अल्पोपाहाराची व्यवस्था करून निरोप देण्यात आला.

गेल्या पंधरा वर्षापासून सरदार कुलदीपसिंघ हे दरवर्षी पंजाबातील विविध शहरातील भाविकांना घेऊन नांदेड येथे दर्शनासाठी येतात.दरवर्षी दिलीप ठाकूर हे त्यांची अल्पोपाहाराची व्यवस्था करत असतात.गेल्या वीस वर्षापासून दिलीप ठाकूर हे अमरनाथ यात्रेला जात असताना सरदार कुलदीपसिंघ हे सर्व यात्रेकरूंची लंगर ची व्यवस्था लुधियाना स्टेशनवर करतात.दिलीप ठाकूर यांच्या आग्रहावरून सरदार कुलदीपसिंघ यांनी दरवर्षी नांदेड गुरुद्वारा दर्शनाला संगत घेऊन येतात. गेल्या अनेक वर्षापासून दिलीप ठाकूर व सरदार कुलदीपसिंघ यांनी आपसी भाईचारा जपला आहे.

यावर्षी २ फेब्रुवारी ला लुधियाना येथून निघून १० दिवसाच्या प्रवासात सचखंड गुरुद्वारा, लंगर साहब गुरुद्वारा, शिकरघाट गुरुद्वारा, मातासाहब गुरुद्वारा, नगीनाघाट गुरुद्वारा, बंदाघाट गुरुद्वारा,नानकसर गुरुद्वारा तसेच संत नामदेव यांचे नरसी नामदेव येथील गुरुद्वाराचे दर्शन घेतले आहे. यावर्षीच्या जथ्थ्यामध्ये गुरुमितकौर, दलवीरसिंघ, लख्खासिंघ, अमरजीतसिंघ, सुरेंदकुमार यांच्यासह १०३ पुरुष व ११२ महिला भाविकांचा सहभाग होता. नांदेड रेल्वे स्थानकावर त्यांना निरोप देण्यासाठी राजेशसिंह ठाकूर, सरदार महेंद्रसिंघ पैदल, सिख संगत चे कुलकर्णी, अमरजीतसिंघ कालरा यांच्या सह अनेक जन उपस्थित होते. आगामी अमरनाथ यात्रेमध्ये सेवा करण्याची संधी द्यावी असे आग्रहाचे निमंत्रण देऊन सरदार कुलदीपसिंघ यांनी सर्वांचे आभार मानले.

