Tuesday, March 21, 2023
Home करियर चिखल, विटांच्या मोजणीतून शाळाबाह्य मुलांचे गणित सावरणारी बिनभिंतीची शाळा -NNL

चिखल, विटांच्या मोजणीतून शाळाबाह्य मुलांचे गणित सावरणारी बिनभिंतीची शाळा -NNL

by nandednewslive
0 comment

अवघ्या बारा वर्षांचा अनिकेत कांबळे हा आपल्या भवतालाच्या वास्तवाला व त्याच्या शैक्षणिक गरजांविषयी जो काही सांगत होता, त्यावर कुणाचा विश्वासही बसणार नाही. “मी सकाळी चारला उठतो, बाबाला चिखल टाकू लागतो. चिखल टाकून झाल्यावर फड लावतो. फडाचे काम झाल्यावर गंडे लावतो. मग बाबा ट्रॅक्टरमधून चिखल आणायला जातो. मग भट्टीसाठी लागणारा काळा भुसा, साळ आणायला जातो. मग हात-पाय धुतो. जेवण करतो…!”. ही रोजनिशी त्याच्या तोंडून ऐकतांना कोणीही आवाक होऊन जाईल. उमरखेडहून त्याचे कुटुंब वाजेगावला तात्पुरते स्थलांतरित झाले आहे. उमरखेडच्या शाळेत त्याचे नाव आहे. त्याची शाळा मात्र गावी आहे. गावी कोणी नसल्याने त्याला त्याच्या वडिलांसोबत राहण्याशिवाय पर्याय नाही. असे इथे सारेच अनिकेत आहेत, ज्यांनी चिखल आणि विटांच्या राशी जवळ केल्या आहेत.

विटाचे गणित दंड्याच्या माध्यमातून तो ज्या सफाईपणे सांगत होता तसे एखाद्या स्थापत्यशास्त्र झालेल्या अभियंत्यालाही सांगणे अवघड ठरेल! विटांचा आकार, विटांसाठी लागणारी व तयार झालेली माती, भाजलेल्या विटांची पारख यापासून ते भट्टीला द्याव्या लागणाऱ्या उष्णतेच्या गणितापर्यंत असलेले त्याचे ज्ञान हे तसे पाहिले तर एखाद्या पदवीच्या पुढचे आहे.

स्वानुभव आणि प्रत्यक्ष कृती यातून जे ज्ञान मिळते ते किती खोलाचे असते याची प्रचिती अनिकेतच्या प्रत्येक वाक्यात जाणवत होती. काम आवडते का शिक्षण असा प्रश्न जेंव्हा त्याला विचारला तेंव्हा विटांसाठी कालवलेल्या चिखलांकडे पाहत धैर्याने त्याने उत्तर दिले “शिक्षण”. मला शिकावे वाटते पण बाबांना कामासाठी मदत लागते हे त्याचे उत्तर ऐकुण नकळत समाज म्हणून कोणताही व्यक्ती आपली जबाबदारी पडताळून पाहिल. मुलाच्या शिक्षणाची, भविष्याची काळजी करण्यासमवेत बाप म्हणून आजच्या रोटीचा प्रश्न याला प्राधान्य देऊन अनिकेतच्या वडिलांनी मुलाची मदत घेण्याला प्राधान्य दिले असेल.

banner

नांदेडच्या दक्षिणेकडे वसलेला वाजेगाव परिसर अशा अनेक अनिकेतला घेऊन उभा आहे. वाजेगाव आता नांदेड शहराचाच एक भाग झाला आहे. गोदावरी नदीच्या एका काठाला वाजेगाव तर दुसऱ्या काठाला धनेगावचा परिसर सुरू होतो. ज्यांना शेती नाही, स्वयंरोजगाराची इतर साधने नाहीत असे जिल्ह्यातील काही कुटूंब या काठावर येऊन रोजगारासाठी स्थिरावले आहेत. यात अधिक विस्थापित हे विटभट्टी उद्योगामुळे स्थलांतरीत झालेले आहेत. चार दशकांपासून सुरू असलेल्या विटभट्टी उद्योगाने अनेक स्थलांतरीत कुटुंबांना आधार दिला आहे. परंतू यातून काही इतर प्रश्न निर्माण झाले. यात सर्वात महत्वाचा व नाजूक प्रश्न होता तो म्हणजे इथल्या विस्थापित कुटुंबातील मुलांच्या शालेय शिक्षणाचा. मुलांचे शाळेत प्रवेश तर होते परंतू शाळा मात्र कित्येक मैल दूर असलेल्या त्यांच्या गावात होती.

राज्य शासनाने अशा शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात घेण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळ असलेल्या शाळेत शिक्षणाची सुविधा दिली आहे. ते जिथे असतील तिथे त्यांना जवळ असलेल्या शाळेत त्यांची निकट असेपर्यंत समावून घेण्याचा हा शिक्षणक्षेत्रातला खूप महत्त्वाचा निर्णय ठरला आहे. जिल्ह्यात अशा मुलांची दरवर्षी प्रत्येक भागात फिरून नोंदणी करणे व त्यांना जवळच्या असलेल्या शाळेत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे बालरक्षक म्हणून 727 शिक्षक पुढे सरसावले आहेत. त्यांनी या शैक्षणिक वर्षात 437 मुलांचा शोध घेऊन त्यांना जवळ असलेल्या शाळेत शिक्षणाची सुविधा दिली आहे.

बालरक्षक शिक्षकांनी आपली शालेय जबाबदारी सांभाळून कर्तव्यनिष्ठेने ही जबाबदारी पूर्ण केली हा जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांचा एका अर्थाने गौरवच आहे. याउपरही जी काही थोडीबहुत मुले शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर राहिली त्यांच्यासाठी इतर शिक्षक स्वयंप्रेरणेने शासनाच्या या उदात्त धोरणामुळे पुढे झाली. वाजेगाव येथील अनिकेत सारखी अनेक मुले शिक्षण घेणारी ही विटभट्टी परिसरातील बिनभिंतीची शाळा याचे एक आदर्श उदाहरण म्हणून नावारुपास आले आहे.

या बिनभिंतीच्या शाळेला आकार घालण्यासाठी डायट सारखी शैक्षणिक संस्थेतील प्राध्यापक अभय परिहार, महिला शिक्षिका म्हणजे उषा नळगीरे या पुढे झाल्या. उषा नळगीरे या अर्धापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका आहेत. तिथली सर्व कर्तव्य सांभाळून शनिवार व रविवार असे दोन दिवस त्या या शाळेसाठी देतात.

मुलांनी या बिनभिंतीच्या शाळेत रमावे यासाठी सारे काही येथे साकारले आहे. चिंचेच्या झाडाखाली भरणाऱ्या या शाळेत झोक्यापासून ते रोप क्लायंबिंग पर्यंत, आरोग्याच्या शिक्षणासाठी स्वच्छ हात धुण्यासाठी कॅनमधील पाणी गुरूत्वाकर्षणाच्या सहाय्याने काढून हँडवॉश पर्यंत असलेले प्रयोग विज्ञानाच्या प्रत्यक्ष साक्षात्काराचे द्योतक आहेत. ध्यानाची अनुभूती घेता यावी यासाठी एका झाडाच्या आडोशाला मोठा दगडही येथे कल्पकतेने ठेवला आहे. विशेष म्हणजे ही मुलेही एक-एक करून जमेल तसे आपले चित्त एकवटून इथे बसण्याचा प्रयत्न करतात. याशिवाय वनस्पती व प्राण्यांची ओळख करून देणारा एक कोपरा जंगल क्लब म्हणून साकारला आहे.

माझ्यापासून ते जगापर्यंत समज देण्यासाठी एक कोपरा समाजशास्त्रासाठी आहे. आरोग्यासाठी स्वच्छतेचा कोपरा इथला सजलेला आहे. भट्टीची कामे आटोपून मुले या चिंचेच्या झाडा खालच्या शाळेला येतात. या मुलांना शिकण्यात गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने काही व्यक्तींनी दिलेले साहित्य ही मुले बाहेर काढतात. काही मुले चटई आंथरतात आणि मग सुरू होते यांची शाळा. विटांच्या राशी ज्या पद्धतीने मोजल्या जातात त्या पद्धतीने त्यांना गणित शिकविले जाते. ऐरवी जो चिखल विटांना आकार देतो तो चिखल आणि कोरडी माती इथे आता अक्षरांना आकार द्यायला लागली आहे.

…..लेखक – विनोद रापतवार, जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!