
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी नांदेडच्या माध्यमातून महाराष्ट्रात त्यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाचा विस्तार करत राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला आहे. ५ फेब्रुवारी रोजी नांदेड मध्ये झालेली भारत राष्ट्र समितीची सभा महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात किंबहुना देशाच्या राजकारणात एका नव्या पक्षाने उडी घेतली आहे. तेलंगणा मॉडेलची देशात गरज असल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच त्यांना २४ तास वीज व मोफत पाणी देण्यासाठी ‘बी आर एस’ अर्थात भारत राष्ट्र समिती समर्थ असल्याचे सुतोवाच त्यांनी नांदेडच्या जाहीर सभेत दिले.

केंद्रात एलआयसी क्षेत्रात सरकारने हस्तक्षेप का केलेला आहे .दहा लाख कोटींचा घोटाळा हा गौडबंगाल असून लोकसभेत या विषयावर चर्चा व्हावी असे सांगत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर टीका केली . मोठी गर्दी झालेल्या राव यांच्या जाहीर सभेत राज्यातील माजी आमदारांनी विदर्भातील जिल्हा परिषद सदस्यांनी पक्षात प्रवेश केला. यात गडचिरोलीचे माजी आमदार दीपक आत्राम, उदगीरचे आमदार मोहन पटवारी आणि यवतमाळचे माजी आमदार राजू तोडसाम, ठाण्याचे दिगंबर भिसे यांचा समावेश आहे. तसेच शेतकऱ्यांचे नेते प्रकाश पोहरे, परभणीचे माणिकराव कदम ,संभाजी ब्रिगेड किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे, ढोलीराम काळदाते आदी नेत्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकारसह महाराष्ट्रातील सरकावरलाही आपल्या टीकेचे लक्ष्य केले.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी बाभळीच्या पाणी प्रश्नावर महाराष्ट्रातील नेत्यांना जबाबदार धरले. बीआरएस महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केल्याचे सांगून विधानसभेच्या सर्वच जागा भारत राष्ट्र समिती लढविणार असल्याचे त्यांनी नांदेडमध्ये जाहीर केले. भारत राष्ट्र समितीकडून सीमावर्ती भागाचे प्रश्न सोडवण्यात येतील असे सांगून महाराष्ट्रातील राजकीय नेते या कामी अपयशी ठरल्याचा दावा केला. देशात एक लाख चाळीस हजार टीएमसी इतका प्रचंड पाऊस पडतो. जर सरकारची इच्छा झाल्यास या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना शेतात पाणीपुरवठा करू शकतात .परंतु हा विषय गांभीर्याने न घेतल्याने सध्या शेतकरी आत्महत्येकडे वळला व या बाबीस सरकारच जबाबदार असल्याची कडाडून टीका चंद्रशेखरराव यांनी केली .

गोदावरी नदी ही दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी असून महाराष्ट्रातील ५० टक्के भाग नदी खोऱ्याने व्यापला आहे. गोदावरी खोऱ्यातील भौगोलिक क्षेत्र पाहता उपलब्ध पाण्याच्या झालेल्या वाटपात केंद्र शासनाने नेमलेल्या न्यायमूर्ती बच्छाव यांच्या अध्यक्षतेखालील लवादाने १९८० मध्ये दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्राला गोदावरी खोऱ्याततील ४९ टक्के भौगोलिक क्षेत्र असताना प्रत्यक्षात पाणी वाटप ३१ टक्के हिस्सा देण्यात आला असा अहवाल दिला. मात्र, आंध्रसह आणि तेलंगाणा प्रदेशात गोदावरी खोऱ्याचे भौगोलिक क्षेत्र केवळ २३ टक्के असताना आंध्रास पाणी वाटप ३० टक्के वाटा देण्यात आला याबाबतही त्यांनी सरकारवर टीका केली.

पाणी वाटपावरुन मनसेच्यावतीने बीआरएसचा तीव्र निषेध करण्यात येणार होता.केसीआर यांची नांदेड जिल्ह्यात होणारी पहिली सभा उधळून लावून काळे झेंडे दाखवण्यात येतील, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला होता.व या दिशेने मार्गक्रमण करीत असताना पोलिसांनी मनसे अध्यक्ष व साथीदारांना ताब्यात घेतले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये चांगलेच यश मिळेल असे राजकीय भाकीत वर्तविले जात आहे. देशाच्या हितासाठी केंद्र सरकार काय काम करत आहे हे सर्व जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. असे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करू पाहणाऱ्या इतर राजकीय पक्षांनी आपापल्या परीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. २०२४ मध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्या दृष्टीने महाराष्ट्रातील मराठवाडा शेजारी असलेल्या तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री केसीआर हे भारत राष्ट्र समिती अर्थात ‘बीआरएस’ यांनी त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांनी यासाठी मराठवाड्याची पाऊलवाट निवडली आहे. मराठवाडा हा तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेला भाग आहे.

महाराष्ट्रातील राजकारणात प्रवेश करण्यासाठी यापूर्वी देखील तेलंगणा येथील एम. आय. एम. या राजकीय पक्षाने नांदेडच्या माध्यमातून मराठवाड्याच्या राजकारणात व त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केला होता. एम आय एम या पक्षाचे नेते ओवेसी यांच्या पक्षाने नांदेडमध्ये महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. त्यामध्ये एमआयएमचे १३ नगरसेवक निवडून आले होते. त्याच पद्धतीने परंतु त्यापेक्षा काही वेगळी रणनीती आखत तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर यांनी पाच फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये राजकीय सभा घेऊन केंद्र सरकार व महाराष्ट्राच्या कारभारावर टीका केली.
त्या सभेच्या माध्यमातून के सी आर यांच्या भारत राष्ट्र समितीची मराठवाड्यात एन्ट्री झाली आहे. बी आर एस हा महाराष्ट्रासाठी नवीन पक्ष असला तरी तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर यांना त्यांच्या पक्षाची ताकद येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून दाखवून द्यायची आहे. त्यासाठी त्यांनी मराठवाड्यातून या कामाला सुरुवात केली. मराठवाड्यातील सीमावर्ती भागातील नागरिक मागील सहा महिन्यांपासून केसीआर यांच्या संपर्कात होते. सात महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात झालेली राजकीय उलथापालथ ही देखील के सी आर यांच्या मराठवाडा प्रवेशाचे कारण असू शकते. महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची सध्याची अवस्था पाहता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपल्याकडे वळविण्यासाठी भारत राष्ट्र समिती छुप्या पद्धतीने कामाला लागली आहे.
मराठवाड्यातील सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांना घरोघरी जाऊन भेटण्याचे काम भारत राष्ट्र समितीच्या खासदारांनी तसेच आमदारांनी केले . महाराष्ट्रात अकरा लाखापेक्षा अधिक तेलगू भाषिक असल्याने त्यांच्या माध्यमातून आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी भारत राष्ट्र समितीने मराठवाड्याच्या शेजारी असलेल्या भोकर ,धर्माबाद, देगलूर, उमरी, नायगाव या तालुक्यांची निवड केली. हा भाग काँग्रेसचा पट्टा असल्याने भविष्यात या भागातून काँग्रेस नेस्तनाबूत होऊ शकते.
तेलंगणा राज्यातील निजामाबाद जवळील आरमुरचे नेतृत्व करणारे आमदार जीवन रेड्डी तसेच मंचरियाल जिल्ह्यातील चेन्नूरचे नेतृत्व करणारे आमदार बालका सुमन, जहीराबाद चे खासदार बी.बी. पाटील त्याचबरोबर माजी मंत्री व आदीलाबादचे आमदार जोगु रमन्ना व कामारेड्डीजवळील जुक्कल येथील आमदार हनुमंत शिंदे व करीमनगरचे माजी महापौर रवींद्र सिंग हे सध्या भारत राष्ट्र समितीचे प्रमुख या नात्याने मराठवाड्यात नांदेड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. नांदेडला तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर यांच्या सभेसाठी ही मंडळी नांदेडमध्ये तळ ठोकून होती. नांदेड जिल्ह्यातील बिलोली ,धर्माबाद, भोकर या सीमावर्ती भागात त्यांनी बी आर एस मध्ये येऊ पाहणाऱ्या अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी व नेत्यांच्या भेटी घेतल्या व त्यांचा पक्षप्रवेश सोहळा मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत करून घेतला.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर यांच्या महाराष्ट्रातील नांदेडमध्ये होणाऱ्या पहिल्या जाहीर सभेत मराठवाड्यातील अनेक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करतील असा दावा या नेत्यांनी केला होता. शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर ज्या शिवसेनेच्या नेत्यांनी कुठल्याही गटात प्रवेश केला नाही अशा नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना गळ घालत भारत राष्ट्र समितीच्या नेत्यांनी त्यांना आपल्या पक्षात ओढण्याचे राजकारण सुरू केले . मराठवाड्याच्या शेजारी असलेल्या तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांसाठी अनेक सवलती व योजना आहेत. त्याच योजना मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळतील ही आशा दाखवत तेलंगणातील भारत राष्ट्र समिती या राजकीय पक्षाने सुरुवातीला शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. पाच मुद्द्यावर मुख्यमंत्री के सी आर यांनी भाषण करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था कथन केली.
त्यांना तेलंगणातील अनेक सवलतींची माहिती दिली व त्यांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अनेक शेतकरी नेते व शेतकरी भारत राष्ट्र समितीच्या गळाला लागले आहेत. याशिवाय शिवसेना व काँग्रेस या पक्षावर नाराज असलेल्या व या दोन्ही पक्षामधून बाजूला सारलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांना भारत राष्ट्र समितीने आपल्या जाळ्यात ओढले आहे. शेतकरी तसेच नाराज नेते व पदाधिकारी यांच्या जीवावर भारत राष्ट्र समितीने आपली राजकीय वाटचाल सुरू केली आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका तसेच विधानसभा व लोकसभा या सर्व निवडणुका लढविण्याच्या दृष्टीने भारत राष्ट्र समिती मराठवाड्यात कामाला लागेल, असा दावा मुख्यमंत्री के सी आर यांनी आपल्या भाषणात केला. भारताचे नेतृत्व नरेंद्र मोदी हेच समर्थपणे करू शकतात असे देशातील बहुतांश नागरिकांना वाटत असताना मराठवाड्याच्या दिशेने महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री घेणाऱ्या बीआरएस पक्षाला कितपत यश मिळेल हे येणारा काळच सांगू शकेल.
भारत राष्ट्र समितीने नांदेडमध्ये सभा घेऊन राष्ट्रीय राजकारणाचे रणशिंग फुंकले आहे. नांदेडमध्ये सभा घेतल्यास ती चर्चा महाराष्ट्रात होईल यादृष्टीने मुख्यमंत्री के सी आर यांनीच नांदेडमधील सभा निश्चित केली . तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर यांच्यासाठी मराठवाड्याची ही पाऊलवाट असली तरी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात त्यांनी राजकीय एंट्री घेतली आहे, हे मात्र निश्चित.
…अभयकुमार दांडगे, नांदेड. मराठवाडा वार्तापत्र, ९४२२१७२५५२,abhaydandage@gmail.com
