नांदेड| जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा मधील इयत्ता पाचवी ते आठवीच्या गुणवंत विद्यार्थ्यांची सहल मार्च महिण्यात अंतरिक्ष केंद्र श्रीहरीकोटा आंध्रप्रदेश येथे काढण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील हा कार्यक्रम असून नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या मार्गदर्शनात नियोजन करण्यात आले आहे.
उपग्रह प्रक्षेपणाचा प्रत्यक्ष अनुभव, थुंबा येथील स्पेस म्युझियम, विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल अँड टेक्निकल म्युझियमचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, संशोधन वृत्तीचा विकास व्हावा, विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांच्या कार्यपद्धतीची जवळून ओळख व्हावी, नवनिर्मितीस हातभार लागावा विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील संशोधन प्रक्रिया कळावी या हेतूने अंतरिक्ष केंद्र श्रीहरीकोटा आंध्र प्रदेश येथे गुणवत्तापूर्ण शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल आयोजित करण्यात येत आहे.
यासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या इ. पाचवी ते आठवीमधील विद्यार्थ्यांची निवड चाचणी घेऊन करण्यात येणार आहे . ही सहल मार्चच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये काढण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यातून 3 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. केंद्रस्तरावर दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी परीक्षा होईल यात वस्तुनिष्ठ स्वरूपाचे 50 प्रश्न विचारले जातील आणि एकूण 100 गुणांची ही परीक्षा असेल. तालुकास्तरावर 3 मार्च 2023 रोजी 75 प्रश्नांची 75 गुणांची ही परीक्षा असेल आणि जिल्हास्तरावर 10 मार्च 2023 रोजी 75 प्रश्नांची आणि 75 गुणांची परीक्षा असेल.
केंद्रातून निवडलेले विद्यार्थी तालुक्यावर आणि तालुक्यातून निवडलेले विद्यार्थी जिल्हा स्तरावर आणि जिल्हास्तरावरून विद्यार्थ्यांची प्रति तालुका 3 याप्रमाणे एकूण 16 तालुक्यातील 48 विद्यार्थी निवडण्यात येणार आहेत. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समिती स्थापन करण्यात येत आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे सहअध्यक्ष तर सदस्य सचिव या शिक्षणाधिकारी प्राथमिक आहेत. या समितीत उपशिक्षणाधिकारी प्राथमिक आणि जिल्ह्यातील एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी करून अधिकाधिक विद्यार्थी परीक्षेला बसविण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी डॉ.सविता बिरगे यांनी केले आहे.