
औरंगाबाद| राज्य मंत्रिमंडळाने नागपूर अधिवेशनात राज्यातील शिक्षण सेवकांना मासिक मानधनवाढ तसेच शाळांना अनुदान देण्यास मान्यता दिली. मात्र, शासन आदेश काढण्यास टाळाटाळ होत होती. आमदार होताच शिक्षणमंत्री, शिक्षण सचिवांची भेट घेऊनशासन आदेश केव्हा काढणार याचा जाब विचारून शासन आदेश काढून घेतला. त्यानंतरच आमदारकीची शपथ घेतली. निवडणुकीदरम्यान शिक्षकांना दिलेले वचन, आश्वासनांची पूर्तता निवडून येताच करण्यास सुरूवात केलीय़ शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबध्द असल्याचे आश्वासन आ. विक्रम काळे यांनी दिले.

नुकत्याच झालेल्या औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत महाविकास आघाडीचे उमेदवार आ.विक्रम काळे यांनी विजय मिळवला. या विजयाबद्दल मुप्टा शिक्षक संघटनेच्या वाळूज महानगर विभागाच्यावतीने रविवारी (दि.१२) मसिआ हॉल येथे आ.सतीश चव्हाण यांच्या हस्ते आ.विक्रम काळे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर मुप्टा शिक्षक संघटनेचे संस्थापक सचिव प्रा.सुनील मगरे, अध्यक्ष प्रा.संभाजी वाघमारे, सचिव बी.जी.गायकवाड, मुप्टाच्या महिला संघटक प्रतिभा पाटील, डॉ.भास्कर टेकाळे, डॉ.सना कादरी, के.एम.शिंदे, अण्णासाहेब जाधव, विकास सवई, प्रदीप विखे, संदीप काजळे, लक्ष्मण हिवाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सत्काराला उत्तर देताना आ. काळे म्हणाले, शिक्षकांचे अनेक प्रश्न आपण पोटतिडकीने सभागृहात मांडले. सरकार आपले असो की विरोधी पक्षाचे असो शिक्षकांच्या प्रश्नांसाठी मी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली. कधीच शिक्षकांच्या बाबतीत भेदभाव केला नाही. खरे तर शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे प्रश्न देखील निर्माण होत राहणार. निवडणुकीदरम्यान ‘शिक्षक हाच माझा पक्ष, शिक्षक हीच माझी जात’, शिक्षकांसाठीच शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार असे ठामपणे सांगितले होते.

मतदारांनी दाखविलेल्या विश्वासानंतर निवडून येताच दुसऱ्या दिवसांपासून विविध शाळांना भेटी देऊन शिक्षकांशी संवाद साधण्यास सुरूवात केलीय. इतकेच नव्हे तर निवडून येताच ‘कायम’ विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व ‘कायम’ शब्द वगळलेल्या (इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त) त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना अनुदान मंजूर करण्यासंदर्भात शासन आदेश काढण्यास भाग पाडले आहे. येणाºया काळातही शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी सदैव तुमच्या सोबत असेल असे देखील आ.विक्रम काळे यांनी यावेळी सांगितले.

तर शिक्षकांचे अनेक प्रश्न आज शासन दरबारी प्रलंबित आहेत, याची आम्हाला जाणीव आहे. आ.विक्रम काळे यांच्यासह शासनस्तरावर पाठपूरावा करून हे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही आ. सतीश चव्हाण यांनी दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुमार बिरदवडे यांनी केले.

