नांदेड। डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त राज्यस्तरीय खुली डॉ. शंकररावजी चव्हाण स्मृती वक्तृत्व स्पर्धचे आयोजन शहरातील आयटीएम सभागृह येथे रविवार (ता.१२) रोजी करण्यात आले होते. यावेळी तरुणाईच्या मोठ्या प्रतिसादात स्पर्धा संपन्न झाली. स्वातंत्र्य चळवळीत व स्वातंत्र्यानंतर देशाच्या जडणघडणीत काँग्रेसचे योगदान, या विषयाच्या अनुषंगाने तरुणाईने काँग्रेसच्या कार्याची व विचाराची अभ्यासपुर्ण मांडणी यावेळी केला.
माजीमंत्री डी. पी. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. यावेळी आ. मोहनराव हंबर्डे, काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, जिल्हाप्रवक्ते संतोष पांडागळे, नांदेड तालूकाध्यक्ष मनोहर पाटील शिंदे, जिल्हा सरचिटणीस भास्करराव पाटील जोमेगावकर, सरपंच पिंटू पाटील शिंदे, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, स्पर्धेचे आयोजक तथा नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सचिव बापूसाहेब पाटील आदी जण उपस्थित होते. नांदेडसह सांगली, लातूर, हिंगोली, परभणी आदी जिल्हातून ६२ युवक युवती सहभागी झाले होते. अवघ्या सात मिनिटात, स्वातंत्र्य चळवळीत व स्वातंत्र्यानंतर देशाच्या जडणघडणीत काँग्रेसचे योगदान या विषयावर तरुणाईने अभ्यासपुर्ण मांडणी करत काँग्रेस कार्याचा व विचाराचा जागर केला.
प्रथम पुरस्कार दहा हजार रोख, सन्मानचिन्ह प्रमाणपत्र, द्वितीय पुरस्कार पाच हजार रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, तृतीय पुरस्कार तीन हजार रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व दोन प्रोत्साहनपर सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. स्पर्धेचा निकाल २० जानेवारी रोजी घोषित होणार आहे. अशी माहिती प्रस्ताविकात आयोजक तथा नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सचिव बापूसाहेब पाटील यांनी दिली आहे. स्पर्धेचे परिक्षण प्रा. कल्पना जाधव यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी राहूल जोंधळे, शेख कलिम यांनी परिश्रम घेतले तर सुत्रसंचालन पत्रकार दिंगाबर शिंदे यांनी केले.