Wednesday, March 29, 2023
Home लेख स्वैराचाराचे समर्थन करून समाजव्यवस्था मोडकळीस आणणारा व्हॅलेंटाईन डे -NNL

स्वैराचाराचे समर्थन करून समाजव्यवस्था मोडकळीस आणणारा व्हॅलेंटाईन डे -NNL

by nandednewslive
0 comment

प्रस्तावना – प्रतिवर्षी 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे का साजरा केला जातो ? या दिवसाचा इतिहास काय आहे ? असे अनेक प्रश्‍न आपल्या मनात निर्माण होतात. दुर्दैवाने याविषयीच्या कोणत्याही प्रश्‍नाचे योग्य उत्तर कुठेही उपलब्ध नाही. विविध संकेतस्थळांवर व्हॅलेंटाईन डेचा इतिहास मिस्ट्री म्हणून संबोधला गेला आहे. युरोप मध्ये अजूनही संदिग्धता आहे की, नक्की कोणत्या व्हॅलेन्टाईन नावाच्या व्यक्तिपासून याला सुरुवात झाली. अर्थातच, जसे 1 जानेवारी या दिवसाला काहीही सामाजिक, धार्मिक, कौटुंबिक, वैज्ञानिक किंवा आध्यात्मिक कारण नाही, तरीही हा दिवस नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो, तसेच व्हॅलेंटाईन डेचेही आहे. या दिवशी राष्ट्रद्रोही व्हॅलेंटाईनला त्याच्या राष्ट्रद्रोही कृत्याविषयी फाशी देण्यात आली होती.तिसर्‍या शतकात रोम येथे व्हॅलेंटाईन नावाचा एक पाद्री (प्रीस्ट) होता. त्या काळातील क्लॉडीयस 2 नावाच्या राजाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्यामुळे त्याने व्हॅलेंटाईनला ठार मारण्याचा आदेश दिला होता.खरे पाहता व्हॅलेंटाईन डे ख्रिस्ती पंथाशी निगडित आहे.हा दिवस साजरा करून आपण एक प्रकारे एका दिवसाचे वैचारिक धर्मांतर करत असतो. 14 फेब्रुवारीला असणाऱ्या व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने ‘व्हॅलेंटाईन डे’चे वास्तव काय आहे ? समाजव्यवस्था मोडकळीस आणणारा व्हॅलेंटाईन डे खरोखरीच साजरा करावा का ? ते या लेखाद्वारे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.

ख्रिस्ती पंथाशी निगडित असलेला ‘व्हॅलेंटाईन डे’ – हिंदु धर्मात प्रेमाला किंवा प्रेम व्यक्त करण्याला कधीही निषिद्ध मानलेले नाही. हिंदु धर्मात मानसिक स्तरावरील प्रेमाच्याही पुढे असलेल्या आध्यात्मिक स्तराच्या (निरपेक्ष प्रेमाला) श्रेष्ठ मानले जाते. प्रेमभाव असल्याविना प्रीती हा गुण विकसित करता येत नाही; मग हिंदु धर्म प्रेमाचा निषेध कसा करणार ? व्हॅलेंटाईन डे ख्रिस्ती पंथाशी निगडित आहे. हिंदु धर्मात जे काही सण, उत्सव साजरे केले जातात, त्यांना आध्यात्मिक आणि शास्त्रीय आधार असतो, उदा. दत्त जयंती, गणेश चतुर्थी, श्रीरामनवमी इत्यादी सणांना असणारे महत्व हेच सांगते.या दिवशी त्या त्या देवतांचे तत्त्व पृथ्वीवर पुष्कळ प्रमाणात येत असल्याने सर्वांना त्याचा लाभ होतो. हिंदु धर्मातील संतांच्या पुण्यतिथीला त्या त्या संतांचे तत्त्व सर्वांना मिळते. व्हॅलेंटाईन डे, मदर्स डे, फादर्स डे, फ्रेंडशिप डे, पाश्‍चात्त्य विचारसरणीचे आहेत.या दिवशी प्रेम,माता, पिता आणि मैत्री यांचे तत्त्व पृथ्वीवर येत नसल्यामुळे त्याचा कुणालाही लाभ होत नाही; म्हणूनच असे दिवस साजरा करणे म्हणजे सर्वांबरोबरच देशाची आर्थिक, सामाजिक अन् कौटुंबिक हानी करणे आहे.

‘व्हॅलेंटाईन डे’मागील छुपे अर्थकारण – पाश्‍चात्त्यांनाही आश्‍चर्य वाटेल,असे 7 फेब्रुवारीपासून 14 फेब्रुवारीपर्यंत रोझ डे, प्रपोझल डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, किस डे आणि व्हॅलेंटाईन डे असे दिवस लागोपाठ भारतात साजरे केले जातात. एवढे दिवस विदेशातही साजरे केले जात नाहीत. व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी मोठ्या प्रमाणावर चॉकलेट, खेळणी, भेटवस्तूंची विक्री होत असते आणि विदेशी आस्थापने त्याचा लाभ उठवतात. भारतात व्हॅलेंटाईन डे च्या काळात आर्चीझ नावाच्या शुभेच्छापत्र बनवणार्‍या आस्थापनाची शुभेच्छापत्रांची विक्री 10 पटींनी वाढते. या काळात शुभेच्छापत्र बनवणार्‍या आस्थापनांचा मोठ्याप्रमाणावर व्यवसाय होतो. त्यामुळे या वस्तू विकत घेऊन आपण विदेशी आस्थापनांना कोट्यवधी रुपये नफा कमवून देत आहोत.यावरून ‘व्हॅलेंटाईन डे’मागील छुपे अर्थकारण लक्षात घेण्यासारखे आणि महत्वाचे वाटते.

युवा पिढीला चुकीच्या मार्गावर नेण्याचे षड्यंत्र – सध्या अधिकाधिक मुले-मुली व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. एका सर्वेक्षणानुसार सुमारे 30 टक्क्यांहून अधिक मुले मुलींशी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी हा दिवस साजरा करतात. गर्भनिरोधक बनवणार्‍या आस्थापनाच्या मतानुसार इतर दिवसांच्या तुलनेत या दिवशी गर्भनिरोधकांची विक्री अधिक होते.अर्थातच, अविवाहित मुले-मुली या दिवशी लैंगिक संबंध ठेवतात हे यातून अधोरेखित होते.या काळात गर्भपाताचे प्रमाणही अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे.

यावरून सध्या या दिवसाला बीभत्स स्वरूप आल्याचे लक्षात येते. इंटरनॅशनल बिझिनेस टाइम या इ-दैनिकानुसार व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सुसाईड हेल्पलाईनला सर्वांत जास्त फोन येतात. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मनाप्रमाणे प्रेम न मिळाल्याने निर्माण होणारा एकाकीपणा आणि भग्न मानसिकता ही त्यामागची कारणे आहेत. भारतीय संस्कृतीचे आचरण करून देश-विदेशातील अनेक लोक आनंद आणि शांती यांचा अनुभव घेत आहेत; मात्र भारतातील युवा पिढी ‘व्हॅलेंटाईन डे’सारख्या पाश्चात्त्य संस्कृतीचे आचरण करण्यात धन्यता मानत असल्याने ती अशांत, दुराचारी आणि एड्सची शिकार होत आहे. आपल्या देशातील चांगल्या आणि तरुण पिढीला चुकीच्या मार्गावर नेण्याचे हे एक षड्यंत्रच आहे. आर्थिक हानीसह या देशातील भारतीय संस्कृतीची अपरिमित हानी अशा चुकीच्या डे मुळे होत आहे.

व्हॅलेंटाईन डे ऐवजी मातृ-पितृ दिन साजरा करा – व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याऐवजी या दिवसाचा अनेक अल्पवयीन मुलींना मातृत्व देणारा दिवस म्हणून धिक्कार करा,असे मत प्रख्यात वृत्तवाहिनी बी.बी.सी.ने व्यक्त केले होते.व्हॅलेंटाईन डे अनेक देशांत साजरा होतो; मात्र भारतात हा दिवस मातृ-पितृ दिन म्हणून साजरा करण्याची नवीन पद्धत रूढ होत आहे, ती अत्यंत प्रशंसनीय आहे,असे मत या वृत्तवाहिनीने व्यक्त केले होते.

जगात आणि त्यातल्या त्यात अमेरिकेत व्हॅलेंटाईन डेच्या सुमारास न्यायालयात दाखल होणार्‍या घटस्फोटांच्या खटल्यांत 40 टक्के वाढ होत असल्याचे एका खाजगी आस्थापनाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. या काळात विवाहित स्त्री-पुरुषांच्या विवाहबाह्य संबंधात होणार्‍या घटनांचा परिणाम घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणात होतो, असे दिसून आले आहे. भारतातील नागरिकांची प्रत्येक बाबतीत पाश्चात्त्य देशांचे अंधानुकरण करण्याची वाढती प्रवृत्ती लक्षात घेता, अशी परिस्थिती भारतातही निर्माण होईल हे भारतीयांनी लक्षात घ्यायला हवे. या देशातील भारतीय संस्कृतीची अपरिमित हानी अशा चुकीच्या डे मुळे होत आहे त्यामुळे अशा दिवसांवर बहिष्कार टाकला पाहिजे ! जनतेने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने भारताच्या अर्थव्यवस्थेवर विदेशी आस्थापनांनी टाकलेला हा दरोडा लक्षात घेऊन अशा विकृत दिवसांना कायमचे हद्दपार करायला हवे.

जगातील अनेक देशांनी हद्दपार केलेला व्हॅलेंटाईन डे – अनेक देशांनी व्हॅलेंटाईन डेची हकालपट्टी करत आपल्या देशात विविध डे साजरे करण्याचे ठरवले आहे, उदा. स्लोव्हेनियात 12 मार्चला सेंट ग्रेगरी डे, वेल्स प्रांतात 25 जानेवारीला डॉनवेन डे, ब्राझिलमध्ये 12 जूनला एनामोटड डे साजरा केला जात आहे, तसेच 1969 मध्ये तर रोमन कॅथॉलिक संतांच्या कॅलेंडर्समधून व्हॅलेंटाईन डे काढून टाकण्यात आला आहे, हे विसरू नका. मलेशियातूनही हा डे हद्दपार केलेला आहे. अशा विकृत डेची हकालपट्टी तुम्ही करणार कि नाही ? जगातील अनेक देशांनी हद्दपार केलेला हा व्हॅलेंटाईन डे आम्ही भारतियांनी का डोक्यावर घ्यावा ? आपली संस्कृती सांगते की, व्यक्तीपेक्षा कुटुंब, कुटुंबापेक्षा समाज आणि समाजापेक्षा देश जास्त महत्त्वाचा आहे. हाच दृष्टीकोन ठेवून भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांसारख्या अनेक विरांनी आपले सर्वस्व अर्पण केले आणि त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. व्हॅलेंटाईनचा प्रेमाचा संदेश मानून ते लग्न करून बसले असते, तर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले असते का ? याचा आज विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

हिंदु धर्माचे योग्य शिक्षण घेऊन धर्माचरण करुयात – व्हॅलेंटाईन डे आणि तशा प्रकारचे इतर डे पाश्‍चात्त्यांनी निर्माण केलेल्या कुप्रथा आहेत. आपण हिंदु धर्माचा अभ्यास करून त्याचे आचरण केल्यास केवळ एकच दिवस नव्हे, तर आपल्याला अनेक जन्म आणि जन्ममृत्यूच्या पलीकडे जाता येते. जे सुख आपल्याला अशा प्रकारचे डे साजरा करून मिळते; त्या सुखाच्याही पुढचा आनंद मिळवून देण्याची क्षमता हिंदु धर्माच्या शिकवणीत आहे; म्हणूनच व्हॅलेंटाईन डे सारखा दिवस साजरा करण्यापेक्षा हिंदु धर्माचे योग्य शिक्षण घेऊन धर्माचरण करायला हवे. आपल्या बरोबर इतरांनाही या विषयी जागृत करणे गरजेचे वाटते.

आपल्या देशातील चांगल्या आणि युवा पिढीला चुकीच्या मार्गावर नेण्याचे हे एक षड्यंत्रच आहे, व्हॅलेंटाईन डे च्या पाश्‍चात्त्य विकृतीला आळा बसावा आणि भारतीय संस्कृतीचे संवर्धन व्हावे यासाठी या डे च्या विरोधात युद्धपातळीवरून प्रचार, प्रसार करण्याची आज आवश्यकता आहे. प्रेमाची जादू खरोखरच अनुभवायची असेल,तर आपले क्रांतीकारक, परमवीरचक्रधारी सैनिक, अतिरेक्यांना कंठस्नान घालणारे आमचे तरुण पोलीस, कमांडो यांच्याकडून प्रेम कसे करावे, याचे धडे घेतले पाहिजेत यातूनच व्हॅलेंटाईन डेला आपल्या भारतातून कायमचे हद्दपार करण्याची प्रेरणा मिळेल. हीच आज काळाची आवश्यकता आहे.

….संकलक : कु. प्रियांका लोणे, संपर्क क्र.: 8208443401

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!