
हदगाव, गजानन जिदेवार। हदगाव तालुक्यातील मौजे डाक्याचीवाडी येथे दुपारी अडीच ते तीन च्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीत दोन घर जळून राख झालेले आहेत यात यादव प्रभाकर कोठुळे आणि प्रभाकर रामचंद्र कोठुळे या आदिवासी शेतकऱ्यांचा समावेश आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की डाक्याचीवाडी येथे दुपारी अडीच ते तीन च्या दरम्यान यादव प्रभाकर कोठुळे यांच्या घरात अचानकपणे आग लागली त्या आगीत 25 क्विंटल कापूस, चना 4 क्विंटल, गहू ज्वारी , कपडे लत्ते, जीवनावश्यक वस्तू,यासह मुद्देमाल आगीत भस्मसात झाला आहे… त्याच बरोबर आगीचा भडका एवढा प्रचंड होता की, त्यांच्या बाजूस असणारे प्रभाकर रामचंद्र कोठुळे यांचे सुध्दा घर जळून खाक झाले आहे.

यामुळे मात्र हे दोन्ही कुटूंब अक्षरशः उघड्यावर आले आहेत. गावकरी मंडळी यांनी अथक प्रयत्न करत आग आटोक्यात आणण्यासाठी जिवाची बाजी लावली परंतू तोपर्यंत होत्याचे नव्हते होऊन बसले. गावकरी यांच्या सतर्कतेमुळे गावात इतर ठिकाणी आग पोहोचली नाही अन्यथा पूर्ण गाव आगीच्या तांडवास बळी पडले असते असे प्रत्यक्ष दर्शनी असणारे व्यक्तीने भीती व्यक्त केली होती,अगोदर शेतकरी आपल्या शेती मालास भाव मिळत नसल्याने हवालदिल झाला होता चार दिवस कापूस, चना ई. आदी माल घरात साठून योग्य भाव आला की, विकता येईल या विचाराने साठून ठेवला होता.

पण या प्रकारच्या आगीच्या भक्ष्यस्थानी येऊन शेतकऱ्याच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली हे या घटनेवरून दिसून येते. आगीचे नेमके कारण स्पष्ट नाही, तरी कदाचित शॉट सर्किट मूळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही पण वित्तहानी पुष्कळ झाली, शासनाने या घटनेचा तात्काळ पंचनामा करून पीडित शेतकऱ्यास त्वरित शासकिय मदत मिळुन द्यावी अशी मागणी येथील सरपंच जिगाजी वानोळे यांनी केली आहे .

यावेळी सदर घटनेची माहिती कळताच काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते विजय भाऊ कौशल्य यांनी घटनास्थळी भेट देऊन या घटनेची कल्पना प्रशासनाला देत तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जळगावकर यांना सुद्धा सांगून पीडित कुटुंबांना तातडीने शासकीय मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले, यावेळी रतन गिरी, राजु साळवे सरपंच जिगाजी वानोळे सह अनेक गावकरी उपस्थित होते. यावेळी गावातील तलाठी यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.. अद्याप तरी शासनाने या घटनेचा अधिकृत पंचनामा केला नाही हे मात्र विशेष..

