
हदगाव/तामसा, गजानन जिदेवार। 1819 मध्ये निजाम आणि ब्रिटिशांशी पहिला लढा देणारे आद्य क्रांतिवीर नोवसाजी नाईक यांचा इतिहास फारसा कोणाला माहीत नाही, याचे कारण म्हणजे त्यांच्या शौर्याची गाथा शोधण्याचा कधी प्रयत्नच केला नाही. हल्लीच्या काळात आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा इतिहास विसरत चाललो आहे. आजची तरुण पिढी आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा इतिहास विसरून गेला तर उद्याचा भारत घडवू शकत नाही. असे प्रतिपादन श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांनी केले. यावेळी ते नाव्हा या शौर्यभूमीत संपन्न झालेल्या राजे नोवसाजी नाईक स्मृति सोहळ्यात अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलत होते.

हदगाव तालुक्यातील नाव्हा या शौर्य भूमीत आद्य क्रांतिवीर राजे नोवसाजी नाईक स्मृति सोहळा संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष इंदौरचे होळकर घराण्याचे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार माधवराव पाटील जवळगावकर, विधान परिषद आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव, माजी मंत्री श्रीमती सूर्यकांता पाटील, माजी खा. शिवाजी माने, सेनेचे जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, बाबुराव कदम कोहळीकर, माजी आ. रामराव वडकुते, माजी आमदार गजानन घुगे, माजी आमदार डॉ. संतोष टारफे, ॲड. सचिन नाईक, राम बांगर, साई फुलारे, आदी होते. प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉ. यशपाल भिंगे होते. आद्य क्रांतिकारक राजे नोवसाजी नाईक यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.

पुढे बोलताना राजे होळकर म्हणाले, आद्य क्रांतिकारक राजे नोवसाजी नाईक यांचा पराक्रम आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी आहे. यासाठी तरुणांनी आपल्या पूर्वजांच्या इतिहासाची पाने चाळली पाहिजे. हदगाव तालुक्यातील नाव्हा या शौर्यभूमीत आद्य क्रांतिकारक नोवसाजी नाईक यांचा इतिहास घडल्याने ही भूमी अत्यंत पवित्र आणि पावन बनली आहे. तरुणांनी या भूमीचा इतिहास जागृत ठेवावा असे ते म्हणाले. यावेळी आमदार माधवराव पाटील जळगावकर म्हणाले, हदगाव तालुक्यातील नाव्हा या शौर्यभूमीत राजे नोवसाजी नाईक यांनी स्वातंत्र्य लढ्याची पहिली ठिणगी पेटवली. याचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे त्यांचा पराक्रम विसरून चालणार नाही. या शौर्यभूमीत सैनिकी शाळेसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.

यावेळी प्रमुख वक्ते प्रा. डॉ. यशपाल भिंगे म्हणाले, सध्या सर्वत्र जातीपातीचे राजकारण झाले असून जातीपातीने महापुरुषांना देखील वाटून घेतले आहे. मागील स्मृतिदिनाचे निमित्ताने लोकप्रतिनिधींनी दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण केलेली नसल्याचा कोणाचेही नाव न घेता टोला लगावला. या शौर्यभूमीचा इतिहास न विसरता सत्ताधाऱ्यानी या भागाला पर्यटन स्थळाचा दर्जा द्यावा असे ते म्हणाले.

तर विधान परिषदेच्या आमदार श्रीमती प्रज्ञाताई सातव यांनी ईसापुर धरणाला क्रांतिकारक राजे नोवसाजी नाईक यांचे नाव देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तर माजी मंत्री श्रीमती सूर्यकांता पाटील यांनी या शौर्यभूमीच्या विकासासाठी राज्य आणि केंद्र शासन दरबारी प्रश्न मांडण्याचा विश्वास दिला. आयोजक नाईक बंधूंचे आठवे वंशज डॉ. प्रकाश नाईक यांनी नाव्हा या शौर्यभूमीचा विकास करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत. अशी मागणी प्रास्ताविकात केली. कार्यक्रमासाठी मोठया संख्येने नागरीक उपस्थित होते.

